ताकारी-इस्लामपूर रस्त्याचे काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:39 AM2021-02-26T04:39:24+5:302021-02-26T04:39:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बोरगाव : ताकारी ते इस्लामपूर चाैपदरी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असून मुरूमाऐवजी माती वापरून शासनाच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव : ताकारी ते इस्लामपूर चाैपदरी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असून मुरूमाऐवजी माती वापरून शासनाच्या फसवणुकीचे काम ठेकेदार करत आहे. या कामाची सखोल चौकशी करून ठेकेदार बदलावा, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.
ताकारी ते इस्लामपूर हा मलकापूर-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग आहे. ताकारी ते इस्लामपूर या १५ कि.मी.च्या रस्त्याचे काम अगदी मुंगीच्या गतीने गेले एक वर्ष झाले सुरू आहे. रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या चरीत पाणी साचून आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतातून ऊस बाहेर काढणे कठीण बनले आहे. रस्त्यासाठी जागा जाऊनही अद्याप मोबदला मिळाला नाही आणि आता शेतकऱ्यांना या नव्या समस्येचा सामना करावा लागत आहे.
या रस्त्यासाठी निकृष्ट दर्जाची सामग्री वापरली आहे. साईडपट्टी खुदाईची खोली ही दोन फुटापेक्षा कमी आहे. मुरूमाऐवजी चक्क मातीचा वापर केल्याचा आरोप होत आहे. याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी, अशी मागणी वारंवार करूनही दखल घेतली जात नाही. ठेकेदाराने पावसात तीन किलोमीटरपर्यंत डांबर टाकून रस्ता बनवला होता. तो रस्ताही आता वापराआधीच खचला आहे.
चौकशी
ठेकेदार बदलण्याची मागणी
क्वालिटी कंट्रोलमार्फत तपासणी करून या ठेकेदारावर कारवाई करावी व ठेकेदाराकडून हे काम काढून दुसऱ्या कंपनीला अथवा ठेकेदारास द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.