ताकारी योजना सक्षमपणे कार्यरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:26 AM2020-12-29T04:26:57+5:302020-12-29T04:26:57+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर आणि तासगाव या दुष्काळी तालुक्यांतील जनतेसाठी ‘ताकारी उपसा जलसिंचन योजना’ ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर आणि तासगाव या दुष्काळी तालुक्यांतील जनतेसाठी ‘ताकारी उपसा जलसिंचन योजना’ तारणहार ठरली आहे. याशिवाय येरळा नदीतून वाहत असलेल्या पाण्यामुळे पलूस तालुक्यातील नदीकाठच्या गावांनाही योजनेचा लाभ होत असतो. ही योजना सक्षमपणे कार्यरत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त हाेत आहे.
या वर्षी ताकारी योजनेचे पहिले आवर्तन १० डिसेंबर रोजी सुरू झाले. यामधून पूर्ण क्षमतेने पाण्याचा उपसा सुरू झाला. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बाब आहे. या वर्षी पावसाळा लांबला. यामुळे आवर्तनाची गरज भासली नाही. पाटबंधारेच्या योग्य नियोजनामुळे आवर्तन सुरळीतपणे सुरू आहे. केवळ रब्बीच नव्हे तर उन्हाळी हंगामातही ताकारी योजनेचे आवर्तन वेळेत मिळते. यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यात प्रामुख्याने ऊसपिकाचा समावेश आहे.
सध्या ताकारी योजनेतून १४ हजार हेक्टर शेतीपिकांना पाणी मिळत आहे. ताकारीतून पाण्याची मोठ्या प्रमाणात मागणी होते. यातून शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये कधी-कधी वादही हाेतात. मात्र तरीही एकमेकांना समजून घेऊन योजनेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांवरही वितरणाचे नेटके नियोजन केले जात आहे. ‘टेल टू हेड’ सर्वांना भरपूर पाणी मिळत आहे. त्यामुळे शेतकरी या आवर्तनावर समाधानी आहेत.
ताकारी योजनेसाठी कोयना धरणात ९.३४ टीएमसीसाठा राखीव आहे. सिंचनाखाली आलेले क्षेत्र, मिळणारी पाणीपट्टी, थकीत आणि वसूल पाणीपट्टी, वीज बिल यांचा विचार केला तर सिंचनक्षेत्र अजूनही वाढणे गरजेचे आहे. दुष्काळावर फुंकर घालण्याचे काम ताकारी योजना मागील १७ वर्षांपासून करीत आहे. योजना सर्व बाबतींत सक्षम आहे. मात्र ती अधिक सक्षम होण्यासाठी शेतकरी आणि प्रशासनाच्या इच्छाशक्तीची गरज आहे.
चौकट : शेतकऱ्यांचे सहकार्य हवे
उसाशिवाय अन्य पिकांची पाणीपट्टी मिळत नाही. अशा शेतकऱ्यांनी पैसे भरणे गरजेचे आहे. अजून लाभक्षेत्र वाढून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर होणे आवश्यक आहे. अपुरे कर्मचारी असल्याने वितरणात शेतकऱ्यांचे सहकार्य मिळाले तर योजना याहूनही अधिक सक्षम होईल.
राजन डवरी
कार्यकारी अभियंता
ताकारी योजना
फोटो : ताकारी कालवा संग्राह्य फोटो वापरावा.