कृष्णा नदीवरील बंधाऱ्याचे बर्गे न काढणाऱ्यांवर कारवाई करा, महापूर नियंत्रण समितीची मागणी
By अशोक डोंबाळे | Published: June 14, 2024 01:59 PM2024-06-14T13:59:28+5:302024-06-14T14:00:29+5:30
..तर महापुरास पाटबंधारे विभाग जबाबदार
सांगली : सांगलीत कृष्णा नदीवरील बंधाऱ्यातील बर्गे पावसाळा सुरू होण्यापूर्वी काढणे गरजेचे होते. पण, त्याकडे सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सांगलीत महापूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. नियमानुसार बर्गे काढण्याचे काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे केली. यावेळी महापूर नियंत्रण समितीचे अध्यक्ष सर्जेराव पाटील, निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले की, एक जूनपूर्वी कृष्णा नदीसह सर्व नद्यावरील बंधाऱ्यातील बर्गे काढून टाकावेत असा नियम आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. बंधाऱ्यात गाळही साठून राहात नाही. सांगलीतही असे बर्गेपूर्वी काढले जात होते. बर्गे काढल्यामुळे महापुराचा धोका कमी होतो असे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे समितीतर्फे वारंवार बर्गे काढण्याबाबत मागणी करूनही यावर्षी पुन्हा बर्गे काढण्याबाबत टाळाटाळ करण्यात आली आहे. महापुराचा धोका त्यामुळे वाढणार आहे.
आम्ही नुकताच अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्याचा पाहणी दौरा केला. त्यावेळी कर्नाटकातील अधिकाऱ्यांना आम्ही हिप्परगी बंधाऱ्यातील बर्गे काढण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी तातडीने बँरेज दरवाजे वर केले आहेत. आम्ही समक्ष येताना पाहिले. कर्नाटकातील अधिकारी विनंतीनुसार लगेच कार्यवाही करतात आणि सांगलीतील पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कार्यालय मात्र काम करण्यास टाळाटाळ का करत आहे.
पाटबंधारे विभागात नुकताच पूर नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. परंतु पूर नियंत्रणातील ज्या उपाययोजना आहेत, त्या करण्याबाबत जर चालढकल झाली तर त्या पूर्ण नियंत्रण कक्षाचा उपयोग काय, असाही सवाल सर्जेराव पाटील यांनी केला. बर्गे काढण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी यांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही पाटील यांनी केली.
..तर महापुरास पाटबंधारे विभाग जबाबदार
यंदा पावसाचा जोर अधिक दिसत आहे. अशावेळी बंधाऱ्यातील बर्गे न काढल्यामुळे जर महापुराचा धोका वाढला तर त्याला सांगली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कार्यालय जबाबदार राहील, असा इशारा सर्जेराव पाटील यांनी दिला आहे.