हक्काचे पाणी हिसकावून घेऊ

By admin | Published: January 3, 2017 11:32 PM2017-01-03T23:32:07+5:302017-01-03T23:32:07+5:30

राजेंद्रअण्णा देशमुख : श्रमिक मुक्ती दलाचा सांगलीत मोर्चा

Take away the claim of the claim | हक्काचे पाणी हिसकावून घेऊ

हक्काचे पाणी हिसकावून घेऊ

Next



सांगली : उरमोडी धरणातील वापरात येऊ न शकणारे पाणी तातडीने राजेवाडी तलाव आणि माण नदीवरील बंधाऱ्यात सोडावे, या मागणीसाठी आतापर्यंत सनदशीर मार्गाने आंदोलन केले आहे. आता हक्काचे पाणी हिसकावून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी मंगळवारी मोर्चावेळी दिला.
श्रमिक मुक्ती दलाच्याच्यावतीने डॉ. भारत पाटणकर व देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी देशमुख बोलत होते. आमराईपासून मोर्चास प्रारंभ झाला. स्टेशन चौक, राजवाडा चौकमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. देशमुख म्हणाले की, उरमोडी धरणातील पाणी प्रतिवर्षी वाया जाते. ते उपयोगात आणण्याची चांगली वितरण व्यवस्थाच उपलब्ध नाही. वाया जाणारे हे पाणी राजेवाडी तलाव व माण नदीवरील बंधाऱ्यात सोडणे गरजेचे आहे. जेणेकरुन त्या पाण्याचा उपयोग दुष्काळ निवारणास होईल. वाया जाणाऱ्या पाण्यातून नुकसान सोसण्याऐवजी ते दुष्काळी भागास दिल्यास पाणीपट्टीद्वारे शासनाला महसूल मिळू शकतो.
पाटणकर म्हणाले की, टेंभू योजनेतून वगळलेली गावे समन्यायी पाणी वाटपाच्या आमच्या मागणीअंतर्गत मुख्य योजनेत समाविष्ट केली आहेत. त्या गावांना पाणी मिळणार असले तरी, त्यासाठीची यंत्रणा उभारण्यासाठी दोन ते तीन वर्षाचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत पूर्व व उत्तर भागातील गावांना पाणी मिळणार नाही. या गावांचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही केवळ मुख्य योजनेची वितरण व्यवस्था उभी राहण्याच्या कालावधित उरमोडीचे पाणी मागत आहोत. दरवर्षी दुष्काळी भागातील रोहयोची कामे, चारा छावण्या यावर सरकारला वीस ते पंचवीस कोटी रुपये खर्चावे लागतात. दुसरीकडे १२ कोटी रुपयांमध्ये उरमोडीचे पाणी आटपाडी तालुक्यातील पूर्व-उत्तरेतील गावांना मिळू शकते. यामध्ये शेतकऱ्यांचा आणि शासनाचाही फायदा आहे. आम्ही वाया जाणारे पाणी मागत असल्याने व दुष्काळ निवारणाचा खर्च कमी करण्यासाठीचा उपाय देत असल्याने, या मागण्या मान्य करण्यास शासनाला कशाची अडचण आहे?, असा सवालही त्यांनी केला.
यावेळी शैलेश ऐवळे, विजयसिंह पाटील, बाळासाहेब पाटील, हर्षवर्धन देशमुख, बळवंत मोरे, श्रीरंग शिंदे आदींसह तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)
चटणी-भाकरी आंदोलन
राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले, मागणीसाठी लवकरच जिल्हधिकारी कार्यालय आवारात चटणी-भाकरी आंदोलन करण्यात येईल. आजवर आम्ही एकटेच आंदोलनात येत होतो. पुढील आंदोलनात पत्नीसोबत सहभागी होऊ.
आता बेमुदत आंदोलन
पाटणकर म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी उरमोडीच्या पाण्यासाठी लागणारे १२ कोटी रुपये द्यावेत, अन्यथा आचारसंहिता संपल्यानंतर या मागणीसाठी आम्ही बेमुदत आंदोलन करू.
जिल्हाधिकाऱ्यांकडून आश्वासन
आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना निवेदन दिले. आचारसंहितेपूर्वी उरमोडीतील पाणी मिळण्यासाठी १२ कोटी उपलब्ध व्हावेत. त्यासाठी तातडीने महसूलमंत्री आणि जलसंपदामंत्र्यांसोबत बैठक आयोजित करावी, अशी मागणी पाटणकर यांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात सर्व ते प्रयत्न करण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले. खासदार संजयकाका पाटील यांनीही पाटणकर यांची भेट घेऊन मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Take away the claim of the claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.