लाडक्या 'टॉमी'लाही न्या 'राणी चेन्नम्मा' एक्स्प्रेसमधून, श्वानासाठी जनरल तिकिटाची सोय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 04:25 PM2024-05-30T16:25:13+5:302024-05-30T16:25:26+5:30
सांगली : सांगली रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसमध्ये आता वातानुकूलित डब्यात चार फॅमिली केबिन्स उपलब्ध झाल्या असून, कोणत्याही ...
सांगली : सांगलीरेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसमध्ये आता वातानुकूलित डब्यात चार फॅमिली केबिन्स उपलब्ध झाल्या असून, कोणत्याही कुटुंबाला आता त्यांच्या लाडक्या टॉमीसह किंवा अन्य पाळीव प्राण्यासह प्रवास करता येऊ शकतो.
एसी फर्स्ट क्लास डब्यामध्ये सांगली स्थानकापासून चार फॅमिली केबिन्स उपलब्ध असून, एका केबिनमध्ये चार व्यक्ती प्रवास करू शकतात. याच डब्यामध्ये सांगली स्थानकावरून जोडप्यांसाठी चार कुपे केबिन उपलब्ध आहेत. एका कुपेमध्ये दोन प्रवासी प्रवास करू शकतात. प्रत्येक केबिन व कुपेमध्ये आपले पाळीव प्राणी म्हणजेच कुत्रा, मांजर, पक्षी घेऊन जाता येते. त्यासाठी गाडी सुटण्याच्या दोन तास आधी सांगली स्थानकावरून स्टेशन मास्तरांना कळवून परवानगी घेऊन प्रवास करावा लागेल.
राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसच्या माध्यमातून सांगलीतील प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. सांगली स्थानकावरून सुटणारी ही पहिली एक्स्प्रेस ठरली आहे. त्याला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अपेक्षेपेक्षा अधिक उत्पन्न या गाडीला मिळत असल्याने ती कायम सुरू राहणार आहे. या गाडीसाठी तिकिटांची उपलब्धता तसेच एसी, स्लीपर कोच गाड्यांसह सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यातच आता पाळीव प्राण्यांसहित प्रवास करण्याची सोयही झाली आहे.
केबिन लॉक करून प्रवास
फॅमिली केबिन लाॅक करून सांगली स्टेशन ते बंगळुरू, हुबळी, दावणगिरी आदी ठिकाणी सुरक्षित प्रवास करता येतो. एसी फर्स्ट क्लास केबिनमध्ये विमानाप्रमाणे सहायकाला बोलावण्यासाठी बेलचे बटणही दिले आहे.
लॉजिंगचा खर्च वाचणार
एसी फर्स्ट क्लास कोचमध्ये आंघोळीसाठी बाथरूम व गरम पाण्यासाठी गिझरची सोय आहे. त्यामुळे सांगलीतून कामानिमित बंगळुरूला जाणाऱ्या लोकांना एसी फर्स्ट क्लासमध्ये आंघोळ करून कपडे बदलून सकाळी बंगळुरूला उतरता येईल. दिवसभर बंगळुरूमध्ये काम आटोपून रात्री ११ वाजता बंगळुरू-सांगली राणी चेनम्मा एक्स्प्रेस पकडून परतता येणार आहे. या काळात त्यांचा लॉजिंगचा खर्च यामुळे वाचणार आहे.
अनेकदा कुटुंबासह प्रवास करताना आपल्या पाळीव प्राण्यांना कोणाकडे तरी सोडून जावे लागते. प्रवाशांना आता त्यांना सोबत घेऊन प्रवास करता येईल. त्यामुळे राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसच्या या केबिन्सचा उपयोग होणार आहे. याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा. - उमेश शहा, सदस्य, रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुप