मधुमेह सांभाळा, कोरोना लक्ष्मणरेषेत राहील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:27 AM2021-04-24T04:27:38+5:302021-04-24T04:27:38+5:30

गेल्या वर्षभरापासून जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाची विविध गुणवैशिष्ट्ये हळूहळू जगासमोर येताहेत. वर्षभरात वेळोवेळी विषाणूने स्वत:च्या गुणसूत्रांत बदल घडवत ...

Take care of diabetes, Corona will stay in Laxman line! | मधुमेह सांभाळा, कोरोना लक्ष्मणरेषेत राहील!

मधुमेह सांभाळा, कोरोना लक्ष्मणरेषेत राहील!

Next

गेल्या वर्षभरापासून जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाची विविध गुणवैशिष्ट्ये हळूहळू जगासमोर येताहेत. वर्षभरात वेळोवेळी विषाणूने स्वत:च्या गुणसूत्रांत बदल घडवत मानवजातीला आव्हान कायम ठेवले आहे. दुसऱ्या लाटेतील युके स्ट्रेन, साऊथ आफ्रिकन स्ट्रेन ही कोरोनाची नवी रूपे उपलब्ध औषधांना दाद देईनाशी झाली आहेत. त्यांच्या संसर्गाचे अत्यंत गंभीर परिणाम कमी प्रतिकार क्षमतेच्या रुग्णांना सोसावत नाहीत. विशेषत: अनियंत्रित मधुमेहामुळे कोरोनाग्रस्तांचे जाणारे बळी ही चिंतेची बाब ठरली आहे.

जागतिक अभ्यासानुसार, मधुमेहाचे रुग्ण कोविड संक्रमणाला त्वरित बळी पडतात. त्यांच्यात कोरोनाची तीव्रता जास्त असते. सर्वसामान्य रुग्णांपेक्षा मधुमेहींचा मृत्युदर दहापटींनी वाढतो. जसा मधुमेहामुळे कोरोना अधिक फैलावतो, तसाच कोरोनामुळेही मधुमेह वाढत असल्याचे निष्कर्ष आहेत. कोरोनाबाधितांपैकी ३० टक्के रुग्णांची रक्तशर्करा वाढते, त्यातील अनेकांना कोरोनातून बाहेर पडल्यावरही मधुमेह कायमचा चिकटतो. कोरोना काळात मधुमेहाची गुंतागुंत, उदा. केटॉसिस, कोमा, मूत्रपिंड निकामी होणे असे अन्य विकार बळावतात. त्यामुळे मधुमेहींची कोरोनाला दूरच राखण्याची जबाबदारी अधिक वाढते.

मधुमेहींनी किमान प्रोटोकॉल पाळला तर कोरोनाला दूर ठेवण्यात काहीअंशी यश मिळेल. रक्तशर्करा घरच्याघरी ग्लुकोमीटरने आठवड्यातून एकदा मोजावी. भरपूर पाणी, पुरेसा पौष्टिक आहार, ३०-४० मिनिटे चालण्याचा व्यायाम, प्राणायाम याची सवय मधुमेहींसाठी सुरक्षाकवच ठरू शकते. आहारात अ, क, ड जीवनसत्वे व झिंक मूलद्रव्यांची कमतरता असेल तर सप्लिमेन्टसद्वारे भरून काढणे कधीही फायद्याचे. मधुमेहीला कोरोनाने ग्रासलेच तर मात्र अत्यंत काळजी घ्यावी लागते. घरगुती विलगीकरणात राहिल्यास तोंडावाटे घ्यायच्या अैाषधांत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बदल करावेत. गरजेनुसार इन्शुलिनचे इंजेक्शन घ्यावे. रक्तातील साखर वरचेवर मोजावी. कोविड रुग्णालयात दाखल करताना मधुमेहाची औषधे बंद करून इन्शुलिन टोचले जाते. कोरोनामुळे अनेकांना न्यूमोनिया होतो. दाहसदृश स्थिती निर्माण होते. अशावेळी स्टेरॉईडस द्यावी लागतात. त्यामुळेही रक्तातील साखरेची मात्रा वाढते. या काळात जेवणानंतर रक्तातील साखर १४० ते १८० मिलीग्राम राहील याकडे लक्ष ठेवावे. मधुमेहाशिवाय अन्य आजार असतील तर कोरोनामुळे आणखी गुंतागुंत वाढण्याचा धोका असतो, त्यादृष्टीने डॉक्टरांच्या संपर्कात राहावे. कोणताही आजार अंगावर काढू नये.

मधुमेहातील गुंतागुंत, रक्त गोठणे, दाहसदृश स्थिती यावर नियमित लक्ष हवे. बोटाला ऑक्सिमीटर लावून सहा मिनिटे चालावे, ऑक्सिजनचे प्रमाण किती कमी होते याची नोंद घ्यावी. मधुमेह नसलेल्या कोरोनाग्रस्तांनी बरे झाल्यावर पुढील सहा महिने अत्यंत काळजी घ्यावी. यातील २० टक्के लोकांना मधुमेह होण्याचा धोका अधिक आहे.

(लेखक मिरजेतील मधुमेह व आंतर्ग्रंथीतज्ज्ञ आहेत).

Web Title: Take care of diabetes, Corona will stay in Laxman line!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.