शिराळा तालुक्यात बिबट्याचा बंदोबस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:26 AM2021-03-26T04:26:02+5:302021-03-26T04:26:02+5:30
शिराळा : तालुक्यामध्ये गेल्या सहा-सात महिन्यांपासून बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बिबट्यांनी पाळीव जनावरांसह माणसांवरही हल्ले केले आहेत. ...
शिराळा : तालुक्यामध्ये गेल्या सहा-सात महिन्यांपासून बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बिबट्यांनी पाळीव जनावरांसह माणसांवरही हल्ले केले आहेत. यामुळे तालुक्यातील विविध भागात वावरणाऱ्या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केली.
देशमुख म्हणाले की, गेल्या सहा-सात महिन्यांपासून तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढला आहे. उत्तर विभाग, पश्चिम व दक्षिण विभागामध्ये सातत्याने बिबट्यांचा वावर असल्याचे लोकांच्या निदर्शनाला येत आहे. वाकुर्डे बुद्रुक, वाकुर्डे खुर्द, शिरशी, अंत्री खुर्द, अंत्री बुद्रुक याठिकाणी बिबट्याने शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ला केला. त्याचबरोबर शेळी, मेंढी, कोंबड्यांवर वारंवार हल्ला करून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. तडवळे येथील एका ऊस तोडणी करणाऱ्या कुटुंबातील बालकावर बिबट्याने हल्ला केला, यामध्ये त्या बालकाचा मृत्यू झाला. तडवळे, उपवळेतील काही शेतकऱ्यांच्या जनावरांच्या वस्तीमध्ये शिरून बिबट्याने लहान-मोठ्या जनावरांवर हल्ला केला आहे. तालुक्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत.
बिबट्याची रहदारी कायमस्वरूपी शेती व शेतीलगत असणाऱ्या डोंगरी भागामध्ये आहे. बिबट्या गावालगत मनुष्य वस्तीपर्यंत आल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने ही बाब गांंभीर्याने घेऊन बिबट्यांचा बंदोबस्त तत्काळ करावा तसेच ज्या शेतकऱ्यांचे पशुपक्षी, पाळीव जनावरे बिबट्याने मारली आहेत, त्यांना त्याची नुकसानभरपाई तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.