बँकेतील पैसा सांभाळा, केवायसीच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:18 AM2021-07-21T04:18:28+5:302021-07-21T04:18:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लॉकडाऊन काळात घरबसल्या काही चुकांमुळे आर्थिक फसवणुकीला बँक ग्राहक बळी पडत आहेत. केवायसीकरिता पाठविण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लॉकडाऊन काळात घरबसल्या काही चुकांमुळे आर्थिक फसवणुकीला बँक ग्राहक बळी पडत आहेत. केवायसीकरिता पाठविण्यात आलेली लिंक ओपन केल्यामुळे खात्यावरील पैसे सायबर गुन्हेगारांकडून लुटले जात आहेत. त्यामुळे बँक ग्राहकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. सांगली जिल्ह्यात जानेवारी ते मे २०२१ या कालावधीत जवळपास २३ टक्के घटना या बँकिंगशी संबंधित आहेत. यात लिंकद्वारे फसवणुकीची एक घटना समोर आली आहे. ओटीपी व ऑनलाइन बँकिंग फसवणुकीच्या घटनांचाही समावेश आहे. त्यामुळे ऑनलाइन लिंक, ओटीपी याबाबत सावध राहणे हा एकमेव पर्याय आहे.
चौकट
अशी होऊ शकते फसवणूक
प्रकरण १
सांगलीच्या एका तरुणाला काही महिन्यांपूर्वी मोबाइलवर एक लिंक पाठविण्यात आली. कर्ज मंजुरीसाठी केवायसी व अन्य बाबींसाठी लिंक पुरविण्यात आली. ती लिंक ओपन केल्यानंतर काही दिवसांनी खात्यावरील काही रक्कम आपोआप अन्य खात्यावर गेल्याचे तरुणास समजले. खात्यावर किरकोळ रक्कम असल्याने त्याने तक्रार केली नाही, मात्र लिंकच्या माध्यमातून फसवणुकीची सायबर क्राइम सेलकडे एक रितसर तक्रार दाखल आहे.
प्रकरण २
मिरजेतील एका तरुणाला स्वस्तातील मोबाइल खरेदी करण्यासाठी पेमेंटची वेगळीच लिंक पाठविण्यात आली. त्यातून रक्कम जमा झाल्यानंतर संबंधित मोबाइल कंपनीने पेमेंट पेंडिंगचा संदेश दिला. त्यातून तरुणाने बरेच प्रयत्न करूनही त्याला हा व्यवहार कसा झाला हे समजले नाही.
चौकट
या गोष्टी करा
काेणतीही ऑफर देऊन लिंक पाठविण्यात आल्यास संबंधित मेलच्या उजव्या बाजूच्या ऑप्शनमधून ‘शो ओरिजनल’ या बटनावर क्लिक करा. त्यानंतर एक विंडो ओपन होऊन लिंक पाठविणाऱ्याचा तपशील देईल. मेलवर दाखविलेली कंपनी व मेल संबंधित विंडोतील लिंकशी जुळली नाही, तर ती लिंक ओपन करू नये.
अश्लील साईटस् मोबाइलवरून ओपन केल्यानंतरही अज्ञात लिंक ओपन होऊन तुमचा डाटा चोरीस जाऊ शकतो.
कोट
कर्ज मंजुरी, केवायसी अपडेशन व अन्य कारणाने मोबाइल किंवा मेलवर आलेली लिंक ओपन करू नये. त्याद्वारे फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे बँक ग्राहकांनी अधिक सतर्क राहावे.
- डी. व्ही. जाधव, जिल्हा प्रबंधक, अग्रणी बँक
कोट
मेसेज किंवा मेलद्वारे आलेल्या लिंक ओपन करण्याची चूक महागात पडू शकते. लिंकच्या माध्यमातून फसवणूक होते. देशभरात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांनी अशा लिंककडे दुर्लक्ष करावे.
- संजय क्षीरसागर, साहाय्यक पोलीस निरीक्षक, सायबर क्राइम सेल