मातीतल्या खेळांचा मोठ्यांनाच लळा !

By Admin | Published: April 9, 2017 11:39 PM2017-04-09T23:39:30+5:302017-04-09T23:39:30+5:30

अनोखी जत्रा : विटी-दांडू, भोवरा खेळण्यावर भर; महिलांची जिबल्यांना पसंती, टायर पळविण्याची शर्यतही रंगली

Take care of the soil of the game! | मातीतल्या खेळांचा मोठ्यांनाच लळा !

मातीतल्या खेळांचा मोठ्यांनाच लळा !

googlenewsNext



सातारा : मातीत खेळण्यात बालपण गेले; पण शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने शहरात आले अन् केवळ आठवणी उरल्या. सातारा हिल मॅरेथॉन असोसिएशनने रविवारी आयोजित केलेल्या ‘मातीतल्या खेळांच्या जत्रा’ यामध्ये चिमुरड्यांपेक्षा मोठीच मंडळी जास्त रमली. विटी दांडू, भोवरा खेळण्यात पुरुष मंडळी तर महिला जिबल्या खेळताना दिसत होत्या. यामध्ये दोन हजारांहून अधिक सातारकरांनी सहभाग घेतला आहे.
सातारा हिल मॅरेथॉनच्या यावर्षीच्या स्पर्धेचे पडघम वाजू लागले आहे. यावर्षी नावनोंदणीच्या समारंभासाठी सातारा हिल मॅरेथॉन असोसिएशनतर्फे रविवारी ‘मातीतल्या खेळांची जत्रा’ भरविण्यात आली होती. जत्रेचे उद्घाटन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी उपनगराध्यक्ष राजू भोसले उपस्थित होते.
कॉम्प्युटर, व्हिडिओ गेम, चेस या खेळांमध्ये दंग झालेली आजची पिढी मातीतले खेळच विसरली आहेत. त्यामुळे मातीची नाळ कमी होत चालली आहे. त्यांचा व्यायाम खुंटल्याने शारीरिक क्षमता कमी होत चालली आहे. त्यांच्यामध्ये मातीतल्या खेळाविषयी आवड निर्माण व्हावी, त्याचप्रमाणे मोठ्यांना जुने खेळ खेळण्याची संधी मिळावी म्हणून सातारा हिल मॅरेथॉन असोसिएशनतर्फे रविवारी मातीतल्या खेळांची जत्रा आयोजित केली होती.
या निमित्ताने जुने खेळ खेळण्याची संधी मिळाल्याने कधी एकदा या साधनांना हात लावू, असे अनेकांना झाले होते. आवडीचा खेळ ताब्यात घेण्यात व आपण मित्रांना कसे वरचढ होत होतो, हे सोबत आणलेल्या नातवंडांना रंगून सांगतानाही काही आजोबा दिसत होते.
यामध्ये शिवकालीन युद्धकौशल्याचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण अतीत येथील छावा ग्रुपचे सदस्य देणार आहे.
प्राचीन लाठी-काठी, तलवार, भालाफेक व दांडपट्टा खेळण्याची संधी मुलांना उपलब्ध करून दिली होती. गोट्या, लंगडी, लगोर, भोवरा, विटी-दांडू, टायरगेम, सॅकसेर असे पारंपरिक खेळ खेळताना अनेकजण दिसत होते. (प्रतिनिधी)
खेळांमध्ये महिलांचाही पुढाकार
लंगडी, जिबली, दोरीवरच्या उड्या, काच-कवडी, शिवणापाणी हे मुलींमध्ये खेळले जाणारे खेळ. लहानपणी या खेळांमध्ये तरबेज असलेल्या अनेक महिलांना ते गेल्या कित्येक वर्षांपासून खेळण्यास मिळाले नव्हते.
रविवारी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या महिलांनी जिबली, दोरीवरच्या उड्या खेळण्यास पसंती दिली. आपल्या सखीला सोबत घेऊन त्या बिनधास्तपणे हे खेळ खेळत होते.
शिवेंद्रसिंहराजेंनी फिरवला भोवरा
‘मातीतल्या खेळांची’ जत्रा या उपक्रमाचे उद्घाटन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व नगराध्यक्ष माधवी कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्षा कदम व उपनगराध्यक्ष राजू भोसले यांनी भोवरा खेळण्याचा प्रयत्न केला. पण तो फार फिरला नाही. त्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भोवरा हातात घेतला. खास शैलीत त्यावर दोर गुंडाळला अन् दोघांकडे कटाक्ष टाकत भोवरा जमिनीवर फेकला. तो यशस्वी फिरल्याचे पाहिल्यानंतर उपस्थितांनीही टाळ्या वाजविल्या.
सुटी सत्कारणी
नव्या पिढीला जुन्या खेळांविषयी माहिती व्हावी, म्हणून अनोख्या उपक्रमांचे आयोजन केले होते. आपल्या मुलांना त्याची माहिती व्हावी म्हणून असंख्य पालक, आजी-आजोबा मुलं, नातवंडांना घेऊन आले होते. यामध्ये महिलांची संख्याही मोठी होती. पण तेथे आल्यावर बालपणीचे खेळ पाहिल्यानंतर मोठ्यांनीच मनसोक्त खेळून ‘रविवारची सुटी’ सत्कारणी लावली.

Web Title: Take care of the soil of the game!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.