वैद्यकीय बिलातील दिरंगाईबद्दल शिस्तभंगाची कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:28 AM2020-12-06T04:28:20+5:302020-12-06T04:28:20+5:30
शिक्षकांच्या प्रलंबित वैद्यकीय बिलाबाबत शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांची भेट घेतली. यावेळी त्यांना शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन ...
शिक्षकांच्या प्रलंबित वैद्यकीय बिलाबाबत शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांची भेट घेतली. यावेळी त्यांना शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर पोळ आणि माने पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, शिक्षकांना ठराविक कालावधित वैद्यकीय बिल मिळालेच पाहिजे. वर्ष झाले तरी शिक्षकांचे वैद्यकीय बिल त्रुटीच्या फेऱ्यात अडकून राहत आहे. बिलाचा एक परिपूर्ण नमुना जिल्हा परिषदेने शिक्षकांना पुरवायला हवा, म्हणजे त्रुटी राहणार नाहीत. तीन महिने कालावधित शिक्षकांचे बिल मंजूर झाले पाहिजे. शिक्षकांचे वैद्यकीय बिल ज्या टेबलवर प्रलंबित राहील, त्या आस्थापनेवर दप्तर दिरंगाईची कारवाई करण्याची गरज आहे. शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाला आहे. शिक्षकांनी नियमितीकरणाचे प्रस्तावही जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर केले आहेत. पण, अद्याप त्या शिक्षकांचे प्रस्ताव मंजूर झाले नाहीत. मुख्याध्यापक, विषय शिक्षकांना त्वरित पदोन्नती मिळाली पाहिजे, अशीही शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली. यावर शिक्षणाधिकारी वाखारे यांनी आठवड्यात पदोन्नती देण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी शिक्षक भारतीचे तासगाव तालुका अध्यक्ष दीपक काळे, उपाध्यक्ष प्रमोद कदम यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
व्याजासह रक्कम द्या
मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या पगारातून २०१५-१६ मध्ये जादा फंड कपात झाला आहे. याबाबत शिक्षक भारती संघटनेने आवाज उठवल्याने संबंधित शिक्षकांना न्याय मिळाला आहे. पण, हे पैसे शिक्षकांना व्याजासहित परत मिळाले पाहिजेत, ही मागणी कृष्णा पोळ यांनी केली. यावर शिक्षणाधिकारी वाखारे यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.