जिल्हा परिषद सदस्यांचा निधी कोविडसाठी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:27 AM2021-05-10T04:27:03+5:302021-05-10T04:27:03+5:30
शेगाव : जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांना १५ व्या वित्त आयोगामधून लाखो रुपयांचा निधी ...
शेगाव : जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांना १५ व्या वित्त आयोगामधून लाखो रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी तालुकास्तरावर एका ऑक्सिजन प्लांटसह ४० बेडचे एक रुग्णालय उभे करता येईल. यासाठी आपण पुढाकार घेऊन ही योजना मार्गी लावावी, अशी विनंती भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील पवार यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याच्या अबंधित निधीतून प्रत्येकी चार लाख रुपये व प्रत्येक पंचायत समिती सदस्याच्या अबंधित निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये असा मिळून कोट्यवधी रुपयांचा निधी कोविड हॉस्पिटलसाठी उभा करता येईल. या निधीतून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एका ऑक्सिजन प्लांटसह ४० बेडचे रुग्णालय उभे राहू शकते. पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील सर्व सदस्यांचे समुपदेशन करावे. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीच्या माध्यमातून जिल्ह्यातील उपचारासाठी हतबल झालेल्या कोरोना रुग्णांना दिलासा द्यावा, असा आशावाद पवार यांनी निवेदनात व्यक्त केला आहे.