सुट्टी घ्या, नाहीतर बायको सोडचिठ्ठी देईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:23 AM2021-03-22T04:23:36+5:302021-03-22T04:23:36+5:30
अविनाश बाड, आटपाडी : गेली बावीस वर्षे आटपाडीतील सर्व मेडिकल दुकानदार हे आठवड्यातून एक दिवस सुटी घेतात. पण सध्या ...
अविनाश बाड,
आटपाडी : गेली बावीस वर्षे आटपाडीतील सर्व मेडिकल दुकानदार हे आठवड्यातून एक दिवस सुटी घेतात. पण सध्या सुटीवरून वादविवाद होऊन मोठी गरमागरम चर्चा होऊ लागली आहे. त्यात एका ज्येष्ठ औषध विक्रेत्यांनी सुटी घ्या; नाहीतर बायको पळून जाईल..बायको सोडचिठ्ठी घेईल ! असा अनाहूत सल्ला दिल्याने औषध विक्रेत्यांमध्ये एकच खसखस पिकली आहे.
आटपाडीत सध्या एकूण ५० औषधांची दुकाने आहेत. या दुकानदारांची आटपाडी मेडिकल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन ही संघटना आहे. या संघटनेमध्ये गेल्या २२ वर्षांपासून प्रत्येक औषध विक्रेत्यांनी त्याच्या सोयीनुसार आठवड्यातून एक दिवस सुटी घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला. सुटीदिवशी दुकान उघडल्यास २०० रुपये दंड ठोठावण्यात येत होता. सध्या या व्यवसायात मोठ्या संख्येने तरुण येत आहेत. बहुतेक तरुणांनी कर्ज काढून व्यवसाय सुरू केला आहे. जागेचे भाडे, वीजबिल आणि कामगारांचा पगार त्यामध्ये दुकानांची वाढलेली मोठी संख्या या सगळ्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सुटी नको, असे तरुण औषध व्यावसायिकांचे म्हणणे आहे. नवनाथ पिंजारी या व्यावसायिकांनी सुटी नकोच अशी मागणी संघटनेकडे केली होती. त्यावर काही दिवसापूर्वी बैठक झाली आणि बहुमताने सुटी रद्दचा ठराव मंजूर झाला. तरीही जुने औषध विक्रेते एक दिवस सुटी घेत आहेत तर नवीन औषध विक्रेते आठवडाभर दुकान उघडे ठेवत आहेत.
चौकट
पैसा नको, घर सांभाळा !
औषध विक्रेता संघटनेचा एक व्हाट्सॲप ग्रुप आहे. या ग्रुपवर एका ज्येष्ठ औषध विक्रेत्यांनी व्यापाऱ्यांच्या पत्नीशी घटस्फोट का होतात त्यांची माहिती घ्या. ते केवळ व्यवसायालाच महत्त्व देत राहिले आणि त्यांनी कुटुंबाला वेळ दिला नाही. त्यामुळे असे घडले. तुमच्या पत्नी आणि मुला-बाळांना तुमचा पैसा नको, तुमचा वेळ आणि तुमचे प्रेम हवे असते. त्यासाठी सुटी घ्या आणि कुटुंबाला वेळ द्या, असा सल्ला दिला आहे.
कोट
आठवड्यातून एकदा सुटी घेण्याबाबत वेगवेगळी मते आहेत. व्यवसायाच्या आणि स्पर्धेच्या दृष्टीने पाहिले तर सुटी न घेणे हिताचे ठरेल. पण सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत सलग दुकानातच थांबले तर कुटुंबासाठी वेळ देणे कठीण होते हेही खरे आहे. त्यासाठी आणखी एकदा बैठक घेऊन त्यात निर्णय होईल
- नीलेश गायकवाड
शहर अध्यक्ष, औषधविक्रेता संघटना