‘त्यांच्या’कडूनच कार्यकर्त्यांची लिस्ट घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 10:55 PM2019-04-05T22:55:53+5:302019-04-05T22:55:58+5:30
अविनाश बाड । लोकमत न्यूज नेटवर्क आटपाडी : ‘हॅलो, प्रभाकर पुजारी बोलताय का?’ ‘हां बोलतोय’. ‘नमस्कार, मी संजयकाकांच्या आॅफिसमधून ...
अविनाश बाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आटपाडी : ‘हॅलो, प्रभाकर पुजारी बोलताय का?’ ‘हां बोलतोय’. ‘नमस्कार, मी संजयकाकांच्या आॅफिसमधून बोलतेय. मला २० ते २५ कार्यकर्त्यांची नावे आणि त्यांचे मोबाईल नंबर सांगा’... ‘अहो, मी पाच वर्षे झाली भाजपचा तालुकाध्यक्ष आहे. आजच कसा पहिल्यांदा फोन केला? पाच वर्षे ज्यांना फोन करत होता, त्यांच्याकडून कार्यकर्त्यांची लिस्ट घ्या...’ आटपाडी तालुक्यात सध्या दोन मिनिटे नऊ सेकंदाची ही ध्वनिचित्रफीत चांगलीच व्हायरल झाली आहे. यातून भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून भाजपचे आटपाडी तालुकाध्यक्ष प्रभाकर पुजारी आणि भाजपचे लोकसभेचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या कार्यालयातून आलेल्या दूरध्वनीवरील संभाषणाची क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
या संभाषणात कार्यालयातून भाजपच्या २० ते २५ कार्यकर्त्यांची नावे आणि मोबाईल नंबर मागण्यात आले आहेत. यावर पुजारी यांनी उलट प्रश्न विचारत, ‘संजयकाकांच्या आॅफिसमधून मला पहिल्यांदाच फोन आला आहे. चुकून लागला आहे का?’, असे म्हटले. यावर संपर्क करणाऱ्या महिला कार्यकर्तीने दुसऱ्या कार्यकर्ती महिलेस फोन दिला. त्यांनीही पुन्हा ‘मी खासदार संजयकाका पाटील यांच्या आॅफिसमधून बोलतेय, मला भाजपच्या २५ ते ३० कार्यकर्त्यांची नावे आणि मोबाईल नंबर द्या’, असे म्हणताच, परत पुजारी यांनी, ‘अहो, मी काय म्हणतोय तुम्ही समजून घेत नाही. पाच वर्षात मला आज कसा काय फोन केलाय?’... ‘सर, आम्हाला जी वरून लिस्ट आलीय, त्यानुसार आम्ही कॉल करतोय’... ‘अहो, पाच वर्षे झाली, मी तालुकाध्यक्ष आहे आणि आजच काकांच्या आॅफिसमधून कसा काय फोन आलाय? त्यांना विचारा ना! तुम्ही पाच वर्षे ज्यांना संपर्क करत होता, त्यांच्याकडून यादी घ्या’...
‘हो सर, तुमचा काय असेल तो निरोप मी काकांना पोहोचवते.’
अहो, पाच वर्षात काकांनी आम्हाला कधी काय विचारलं नाही आणि आता फोन आलाय’... त्यावर हुश्श करत त्या महिलेने ‘धन्यवाद सर’! म्हणून फोन ठेवला.
हे संभाषण ऐकल्यानंतर या निवडणुकीने वातावरण किती तंग बनले आहे हे लक्षात येते. शिवाय संजयकाकांची प्रचार यंत्रणा विविध पातळ्यांवर राबत असल्याचेही स्पष्ट होते. पण ही यंत्रणा निर्दोष नसल्याचेही स्पष्ट झाले.
आटपाडीचे भाजपचे तालुकाध्यक्ष प्रभाकर पुजारी आताचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर कार्यकर्ते आहेत. याची माहिती संजयकाकांच्या यंत्रणेला माहिती नसल्याचे आणि गेल्या पाच वर्षात पक्षापेक्षा आपापले गट नेत्यांनी सांभाळले आणि वाढविले असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. आता ही आॅडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर उलट-सुलट चर्चेला मात्र उधाण आले आहे.
भाजप नेत्यांमध्ये ५ वर्षे ‘धुमस’?
भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकून लोकसभेच्या निवडणुकीत शड्डू ठोकलेले गोपीचंद पडळकर आणि संजयकाकांमध्ये गेली पाच वर्षे काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पडळकरांचे निष्ठावंत भाजपचे तालुकाध्यक्ष प्रभाकर पुजारी यांना गेल्या पाच वर्षात कुठलीही विचारणा केली नसल्याचे संभाषणात त्यांनी म्हटले आहे. वर या प्रकाराची प्रदेश कार्यालयाने चौकशी करावी आणि संजयकाकांना जाब विचारावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
विधानसभेत संजयकाकांची पक्षनिष्ठा कुठे होती?
खासदार संजयकाका पाटील यांना मानणारे आटपाडी तालुक्यात अनेक राजकीय गट आहेत. भाजपचे तालुकाध्यक्ष पुजारी यांनी यावर बोलताना सांगितले की, २०१३ पासून भाजपच्या प्रत्येक मिटिंगला, कार्यक्रमाला मी तालुकाध्यक्ष म्हणून हजर राहिलो आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही जिवाचे रान करून भाजपचे प्रचारकार्य केले. पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत संजयकाकांनी पक्षाशी निष्ठा न ठेवता या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्याऐवजी कॉँग्रेसच्या उमेदवाराला मदत केली, असा आरोप त्यांनी केला. शिवाय मी सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने आजपर्यंत कधीच संजयकाकांचा फोन आला नाही. थेट आता फोन आला आहे, का डावलले हे कळले नाही.