लहान मुलांना संसर्ग रोखण्यासाठी दक्षता घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:21 AM2021-05-28T04:21:01+5:302021-05-28T04:21:01+5:30
कडेगांव : कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासन व आरोग्य ...
कडेगांव :
कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासन व आरोग्य विभागाने याबाबत मोठ्या प्रमाणात दक्षता घ्यावी, या पार्श्वभूमीवर कडेगाव व पलूस या दोन्ही तालुक्यांतील बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांची बैठक घेऊन योग्य सूचना द्याव्यात, अशी सूचना राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केली.
कडेगाव येथील प्रांत कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी डॉ. विश्वजित कदम बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दुडी, प्रांताधिकारी गणेश मरकड, कडेगावच्या तहसीलदार शैलजा पाटील, पलूसचे तहसीलदार निवास ढाणे, कडेगावच्या नगराध्यक्षा संगीता राऊत उपस्थित होत्या. डॉ. विश्वजित कदम म्हणाले, कोरोनामध्ये आरोग्य विभाग व प्रशासन उत्तम काम करीत आहे. तरीदेखील अधिक गांभीर्याने कामे होणे गरजेचे आहे. लोकांनीही प्रशासनास सहकार्य करीत शासनाच्या आदेशाचे पालन करावे व स्वतःची व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, यावेळी पलूस व कडेगाव तालुक्यांतील अनेक ग्रामपंचायतींनी सुरू केलेल्या विलगीकरण कक्षाबद्दल मंत्री डॉ. कदम यांनी समाधान व्यक्त केले.