दंडोबाच्या पायथ्यापासून खरशिंगला जाण्यासाठी भुयारी मार्ग करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:20 AM2021-06-01T04:20:15+5:302021-06-01T04:20:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कवठेमहांकाळ : दंडोबाच्या पायथ्यापासून खरशिंग ता. कवठेमहांकाळ परिसराला जाण्यासाठी नागपूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर खरशिंग फाट्याजवळ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कवठेमहांकाळ : दंडोबाच्या पायथ्यापासून खरशिंग ता. कवठेमहांकाळ परिसराला जाण्यासाठी नागपूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर खरशिंग फाट्याजवळ भुयारी मार्ग करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील गावच्या सरपंचांनी सोमवारी कवठेमहांकाळचे तहसीलदार बी. जे. गोरे यांच्याकडे केली. या मागणीचे निवेदनही त्यांना दिले आहे.
खरशिंग, देशिंग, हरोली, शिंदेवाडी एच, बनेवाडी, मोरगाव, हिंगणगाव, म्हैसाळ एम, करोली टी आदी गावांना जाण्यासाठी खरशिंगचा रस्ता जवळचा आहे. नागपूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर दंडोबाच्या पायथ्याशी खरशिंगला जाण्यासाठीचा रस्ता भुयारी करण्याची गरज आहे. या मागणीचे निवेदन सरपंचांनी तहसीलदारांना दिले आहे. सध्या रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. दंडोबाच्या पायथ्यापासून खरशिंग फाट्याजवळून हा मार्ग जातो. सांगलीहून खरशिंग मार्गे कवठेमहांकाळला येण्यासाठी व कवठेमहांकाळहून सांगलीला खरशिंग मार्ग जाताना या राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी अलकुड एमला वळसा घालावा लागतो. त्यामुळे या भागातील प्रवासी नागरिकांचे हा रहदारीचा मोठा प्रश्न आहे.
त्वरित खरशिंग फाट्याजवळ भुयारी मार्ग करण्यात यावा, अन्यथा नऊ गावचे सर्व ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही सरपंचांनी दिला आहे.
यावेळी खरशिंगचे सरपंच सुहास पाटील, बनेवाडीचे सरपंच प्रवीण माळी, अमित कोळेकर, विष्णू मिरजे, सतीश काशीद, भाऊसाहेब शेंडे आदी उपस्थित होते.