गटारीच्या कामासाठी टाकळीत महामार्गाचे काम अडवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:27 AM2021-05-26T04:27:11+5:302021-05-26T04:27:11+5:30
टाकळी : टाकळी (ता. मिरज) येथे ग्रामस्थांनी मंगळवारी गटारीच्या कामासाठी हेरवाड-दिघंची महामार्गाचे काम अडवून अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी ...
टाकळी : टाकळी (ता. मिरज) येथे ग्रामस्थांनी मंगळवारी गटारीच्या कामासाठी हेरवाड-दिघंची महामार्गाचे काम अडवून अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी ठेकेदार कंपनीच्या सर्व गाड्या अडवण्यात आल्या. काम सुरू करण्याच्या आश्वासनानंतर ट्रक, गाड्या सोडण्यात आल्या.
हेरवाड-दिघंची महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. टाकळीतही सहा महिन्यांपासून रस्ते खोदण्यात आले आहेत. रस्त्याच्या कडेला गटारी खोदण्यात आल्या आहेत. त्या खड्ड्यात पाणी साचत असल्याने दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. सुमारे दीड मीटर रूंदी व आठ फूट खोल असलेला गटारीसाठी खोदण्यात आलेला खड्डा ग्रामस्थांना ओलांडणे मुश्कील झाले आहे. ग्रामस्थांच्या तगाद्यानंतर गटारीचे काम सुरू करण्यात आले. मात्र, चार ठेकेदार हे काम अर्धवट सोडून गेल्याने ढील काम रखडले आहे. त्यामध्येच पाणी साचत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली.
संतप्त ग्रामस्थांनी वेळोवेळी सूचना देऊनही गटारीची काम पूर्ण होत नसल्याने मंगळवारी ठेकेदाराच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत सर्व गाड्या सुमारे दोन तास अडवून धरल्या. गटारीचे काम सुरू झाल्यानंतरच गाड्या सोडणार असल्याच्याचे सांगत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. गुरुवारी गटारीचे काम सुरू करण्याच्या आश्वासनानंतर सर्व गाड्या सोडण्यात आल्या.
यावेळी पंचायत समिती सदस्य किरण बंडगर, सरपंच महेश मोहिते, सोसायटीचे अध्यक्ष महादेव गुरव, रामगोंडा पाटील, सचिन पाटील, प्रवीण कोरे, सुरेश इनाळ, अभिजित पाटील, सुनील पाटील, राजू पाटील आंदोलनात सहभागी होते.