इस्लामपुरात तहसील कार्यालयात तलाठ्याला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:17 AM2021-02-05T07:17:39+5:302021-02-05T07:17:39+5:30
इस्लामपूर : महसूल प्रशासनात दहशतवाद माजवला जात असल्याचा आरोप आ. सदाभाऊ खोत यांनी केल्यानंतर अवघ्या २४ तासांत दहशतवादाचा केंद्रबिंदू ...
इस्लामपूर : महसूल प्रशासनात दहशतवाद माजवला जात असल्याचा आरोप आ. सदाभाऊ खोत यांनी केल्यानंतर अवघ्या २४ तासांत दहशतवादाचा केंद्रबिंदू वरून खाली तहसील कार्यालयात सरकला. एका महिला महसूल नायब तहसीलदारांच्या केबिनसमोर सायंकाळी तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्यात जुंपली. तलाठ्याला मंडल अधिकाऱ्याने मारहाण केली. तलाठ्यांच्या घरातील पत्नी आणि तीन लहान मुलांनी तिथे ठाण मांडले होते.
जिथे मुख्यमंत्र्यांनी नव्या इमारतीचे उद्घाटन करताना दस्तुर खुद्द तहसीलदारांना आपल्या हाताने त्यांच्या खुर्चीत त्यांना जनतेच्या हिताचा चांगला कारभार करा म्हणून बसवले होते. तिथेच हा राडा झाला.
अशोक सदाशिव लोणिष्टे (४७, रा. निनाईनगर, धरणग्रस्त वसाहत) यांनी रात्री उशिरा पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार कैलास बाजीराव कोळेकर या मंडल अधिकाऱ्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लोणिष्टे यांनी दिलेल्या तक्रारीत ते कोळेकर यांना नोंदणीचे काम तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांच्या केबिनमध्ये दाखवत असताना त्यांची जुंपली. यामध्ये कोळेकर यांनी लोणिष्टे यांना मारहाण केली. सहायक पोलीस उपनिरीक्षक बळीराम घुले अधिक तपास करत आहेत.