Sangli: करजगीचा तलाठी सोकावला, ५० हजारची लाच घेताना दुसऱ्यांदा रंगेहात सापडला

By संतोष भिसे | Published: June 13, 2023 06:53 PM2023-06-13T18:53:59+5:302023-06-13T18:55:47+5:30

बेकायदा वाळू साठ्यावर कारवाई न करण्यासाठी मागितली लाच

Talathi from Karajagi in Sangli arrested while accepting bribe of Rs.50 thousand | Sangli: करजगीचा तलाठी सोकावला, ५० हजारची लाच घेताना दुसऱ्यांदा रंगेहात सापडला

Sangli: करजगीचा तलाठी सोकावला, ५० हजारची लाच घेताना दुसऱ्यांदा रंगेहात सापडला

googlenewsNext

दरीबडची : करजगी (ता. जत) येथील तलाठी बाळासाहेब शंकर जगताप (वय ५७, रा. तिल्याळ आसंगी, ता. जत) याला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि. १३) दुपारी १२ वाजता झाली. बेकायदा वाळू साठ्यावर कारवाई न करण्यासाठी त्याने लाच मागितली होती.

जत तालुक्याच्या पूर्व भागातील करजगी व बेळोंडगी या दोन गावांचा तलाठीपदाचा कार्यभार जगतापकडे आहे. तो माजी सैनिक आहे. करजगी येथील तक्रारदाराच्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी वाळू आणली होती. जगताप याने हा वाळूसाठा बेकायदा असून त्याबद्दल तक्रारदारावर कारवाईचा इशारा दिला. घाबरलेल्या तक्रारदाराकडे कारवाई न करण्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी केली. अखेर तडजोडीअंती ५० हजार रूपये मान्य केले. यासंदर्भात सोमवारी (दि. १२) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता ती खरी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी जगताप याच्या तिल्याळ (ता. जत) येथील घराजवळ सापळा लावला. तेथे जगतापने तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यावेळी तात्काळ रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याविरोधात उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक संदीप पाटील, निरीक्षक दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे, अंमलदार प्रीतम चौगुले, ऋषीकेश बडणीकर, अजित पाटील, सलीम मकानदार, सुदर्शन पाटील, रवींद्र धुमाळ, पोपट पाटील, सीमा माने, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, चालक वंटमुरे यांनी ही कारवाई केली.

दुसऱ्यांदा लाच घेताना पकडले

तलाठी जगताप याला यापूर्वी सन २०१४ मध्ये कवठेमहांकाळ तालुक्यात लाच घेताना पकडण्यात आले होते. जमीन खरेदी दस्ताची सातबारा दप्तरी नोंद करण्यासाठी १० हजार रूपयांची लाच घेताना सापडला होता. त्याच्याविरोधात मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण अद्याप  न्यायप्रविष्ठ असतानाच तो दुसऱ्यांदा लाच घेताना सापडला.

Web Title: Talathi from Karajagi in Sangli arrested while accepting bribe of Rs.50 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.