किस्से, कहाण्यांमधून पवारांचा यशोमंत्र

By Admin | Published: January 10, 2016 11:01 PM2016-01-10T23:01:16+5:302016-01-11T00:46:33+5:30

कार्यक्रमात रंगत : सांगलीची रेश्मा, कऱ्हाडचे डांगे आणि उस्मानाबादच्या देशमुखांची यशोगाथा

Tales, the story of Pawar's Yashoda | किस्से, कहाण्यांमधून पवारांचा यशोमंत्र

किस्से, कहाण्यांमधून पवारांचा यशोमंत्र

googlenewsNext

सांगली : अनेक किस्से, कहाण्यांचा अनुभव कथन करीत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी रविवारी सांगलीत, कोणत्याही क्षेत्रात कसे यशस्वी होता येते, याचा मंत्र दिला. सांगलीची रेश्मा पाटील, कऱ्हाडचे डांगे आणि उस्मानाबादच्या देशमुखांच्या विदेशातील कर्तृत्वाचा प्रवास मांडताना त्यांनी, संकटांवर मात करा आणि यशस्वी व्हा, असा सल्लाही दिला. सांगलीतील यंगमेन्स सोसायटीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले की, जगाच्या पाठीवर कुठेही जाण्याची तयारी असली आणि संकटावर मात करण्याची हिम्मत असेल तर, तुम्हाला यशापासून कुणीही रोखू शकत नाही. त्यामुळे यशस्वी होण्यासाठीच्या या गोष्टी अंगी बाळगल्या पाहिजेत. जगाच्या पाठीवर प्रतिकूल परिस्थितीत यशाचे शिखर गाठणारे लोक प्रवासात अनेकदा भेटले. त्यांच्या कहाण्या ऐकून मीही थक्क झालो. इंग्लंडच्या दौऱ्यात असताना एका भारतीय हॉटेलमध्ये मी जेवणासाठी गेलो होतो. त्यावेळी जेवणाच्या ताटाबरोबर चार तळलेल्या मिरच्याही त्याठिकाणी ठेवल्या गेल्या. मी आश्चर्यचकित झालो. ‘या मिरच्या इथे कोणी ठेवल्या?’, असा सवाल मी केला. त्यावर एक तरुणी त्याठिकाणी आली आणि तिनेच त्या मिरच्या ठेवल्याचे सांगितले. आपल्याकडील लोकांना तळलेल्या मिरच्या तोंडाला लागल्याशिवाय जेवणाची चव लागत नाही, असेही तिने सांगितले. रेश्मा पाटील असे तिचे नाव होते. ती सांगली जिल्ह्यातील होती. पदव्युत्तर शिक्षण घेऊन तिने त्या हॉटेलमधील नोकरी स्वीकारली होती.
कऱ्हाड तालुक्यातील डांगे नावाचे एक गृहस्थही न्यूयॉर्कला भेटले. ते मराठीतच बोलत होते. माझ्याशी त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि घरी जेवणाचे निमंत्रण दिले. त्यांचे घर लांब असल्याने माझ्या कार्यक्रमातून वेळ काढून तेवढ्या लांब जाणे शक्य नव्हते. ही गोष्ट जेव्हा त्यांना सांगितली, तेव्हा त्यांनी विमान पाठवून देऊ का, असे विचारले. मला धक्काच बसला. तुमचा उद्योग तरी काय आहे? असे त्यांना मी विचारले. अमेरिकन एअरफोर्सला लागणारे स्पेअरपार्टस् बनविणाऱ्या कंपनीचे ते मालक होते.
कऱ्हाड तालुक्यातील एक साधा माणूस जर अमेरिकेसारख्या देशात स्वत:ची भली मोठी कंपनी उभी करू शकत असेल, तर कोणालाही ही गोष्ट साध्य होऊ शकते. जगाच्या पाठीवर काम करण्याची आणि प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे ते म्हणाले.


शाळेत मी किती कच्चा होतो कळलं का?
व्यक्तिगत अमृतमहोत्सव आणि संस्थात्मक अमृतमहोत्सवाची तुलना करताना शरद पवारांनी, भा. रा. तांबे यांच्या ‘रिकामे मधुघट’ या कवितेची आठवण करून दिली. ‘ढळला रे ढळला दिन सखया’ ही एकच ओळ कशीबशी म्हणून त्यांनी उपस्थितांनाच, ‘पुढच्या ओळी काय?’, अशी विचारणा केली. त्यावर सारेच शांत बसले. ‘शाळेत मी किती कच्चा होतो, हे तुम्हाला यावरून कळले असेल’, असे पवार म्हणाले आणि उपस्थितांत हशा पिकला.


देणेकऱ्यांचा तगादा : देशच सोडला...
टोकियोला विमानतळावर उतरलो, तेव्हा एका माणसाने मला ‘राम राम साहेब’, म्हणून हाक दिली. मी लगेच ओळखले की, हा नक्कीच आपल्या गावाकडचा असणार. त्याने तो उस्मानाबादचा देशमुख असल्याचे सांगितले. त्याची कहाणीही थक्क करणारी होती. गावातील एका निवडणुकीत या देशमुखांनी वारेमाप खर्च केला होता. तरीही निवडणुकीत ते पराभूत झाल्यानंतर, छपाईवाल्यापासून ते पेट्रोल पंपवाल्यापर्यंत अनेक देणेकऱ्यांनी त्यांच्याकडे पैशाचा तगादा लावला होता. त्यामुळे त्यांनी देशच सोडला. सुरुवातीचे काही दिवस स्वित्झर्लंडमध्ये काढून ते जपानच्या टोकियोपर्यंत पोहोचले. दहा बाय वीसच्या जागेत त्यांनी एक रेस्टॉरंट काढले. याठिकाणच्या खिमा-चपातीने जापनीज् लोकांना वेड लावले आणि आता हेच देशमुख तेथे एका मोठ्या हॉटेलचे मालक बनले आहेत, असे पवार म्हणाले.

Web Title: Tales, the story of Pawar's Yashoda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.