आताच्या जागा सोडून राष्ट्रवादीशी बोलणी - पृथ्वीराज पाटील : काँग्रेस इच्छुकांच्या उद्यापासून मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 11:41 PM2018-06-28T23:41:28+5:302018-06-28T23:41:58+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४३-३३ जागांचा प्रस्ताव आला आहे, तो आम्हाला मान्य नाही. काँग्रेसचे नगरसेवक दुसऱ्या पक्षात गेले असले तरी, या जागा पक्षाच्याच आहेत. तिथे उमेदवार महत्त्वाचा नाही.

Talking to NCP leaving the seats now - Prithviraj Patil: interviews of Congress candidates from tomorrow | आताच्या जागा सोडून राष्ट्रवादीशी बोलणी - पृथ्वीराज पाटील : काँग्रेस इच्छुकांच्या उद्यापासून मुलाखती

आताच्या जागा सोडून राष्ट्रवादीशी बोलणी - पृथ्वीराज पाटील : काँग्रेस इच्छुकांच्या उद्यापासून मुलाखती

googlenewsNext

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४३-३३ जागांचा प्रस्ताव आला आहे, तो आम्हाला मान्य नाही. काँग्रेसचे नगरसेवक दुसऱ्या पक्षात गेले असले तरी, या जागा पक्षाच्याच आहेत. तिथे उमेदवार महत्त्वाचा नाही. सध्या काँग्रेसचे ४१, तर राष्ट्रवादीचे २४ नगरसेवक आहेत. या जागा कायम ठेवून उर्वरित जागांवर चर्चा व्हावी, अशी भूमिका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत मांडली. दरम्यान, शनिवार व रविवारी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आहेत.

पाटील म्हणाले, महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. सर्व २० प्रभागात पक्षाकडे मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार आहेत. २२५ अर्जांची विक्री झाली असून १८० जणांनी अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारी दुपारी दोन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यामुळे आणखी १०० जणांचे अर्ज दाखल होतील. ज्यांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे. शनिवारी ३० रोजी सांगलीतील कच्छी जैन भवन येथे सांगलीतील दहा व कुपवाडमधील प्रभाग १ व ८ अशा बारा प्रभागातील उमेदवारांच्या मुलाखती होतील, तर रविवारी मिरजेच्या पटवर्धन हॉलमध्ये मिरजेतील सहा व कुपवाडमधील प्रभाग २ मधील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत.

या मुलाखतींसाठी प्रदेश काँग्रेसने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सतेज पाटील, अभय छाजेड, प्रकाश सातपुते यांची कोअर कमिटी नियुक्त केली आहे. या कमिटीत आपलाही समावेश आहे. या कमिटीसह जिल्हाध्यक्ष आ. मोहनशेठ कदम, आ. विश्वजित कदम, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या जयश्रीताई पाटील उपस्थित राहणार आहेत.

आघाडीबाबत ते म्हणाले, काँग्रेसमधून काही नगरसेवक बाहेर पडले. त्यामुळे आमच्या जागा ३१ झाल्या, तर त्यांच्या वाढून २७ झाल्या आहेत. हा बेस धरून उर्वरित २० जागांबाबत चर्चा करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीने दिला. पण तो आम्ही अमान्य केला आहे. आमच्यातील काही लोक पक्ष सोडून गेले, याचा अर्थ आमचा त्या जागांवरचा हक्क जात नाही. पक्षाच्या चिन्हावर तेथे निवडणूक झाल्याने या जागा पक्षाच्या आहेत. त्यामुळे आमच्याकडे ४१, तर त्यांच्याकडे १९ जागा चिन्हावर लढलेल्या आहेत. त्यांना काही अपक्षांनी पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांची संख्या २४ वर गेली. हा बेस धरून त्यांनी चर्चा करावी, असा नवीन प्रस्ताव काँग्रेसने त्यांना दिला आहे. यावर आता त्यांच्याकडून उत्तर आल्यावर चर्चा होईल.

ताणाताणी नको : पाटील
पृथ्वीराज पाटील म्हणाले, देशात व राज्यात भाजपविरोधात सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. महापालिकेतही ही आघाडी व्हावी यासाठी काँग्रेस सकारात्मक आहे. राष्ट्रवादीने यासाठी योग्य प्रस्ताव द्यावा. आम्ही त्यावर निश्चित विचार करू. आघाडीबाबत चर्चेतून मार्ग निघेल. दोन्हीकडून खूप ताणाताणी होऊ नये, असेही ते म्हणाले.

Web Title: Talking to NCP leaving the seats now - Prithviraj Patil: interviews of Congress candidates from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.