corona virus : दहा प्रयोग होताच ‘तमाशा’वर पडला पडदा!, 'काळू-बाळू'सह दोनशे फड बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 02:00 PM2022-01-10T14:00:11+5:302022-01-10T14:20:09+5:30
सचिन लाड माधवनगर : तब्बल ५० वर्षे तमाशा क्षेत्रात हुकूमत गाजविणाऱ्या राज्यातील दोनशेहून अधिक तमाशा फडांना ‘कोरोना’चा फटका बसला ...
सचिन लाड
माधवनगर : तब्बल ५० वर्षे तमाशा क्षेत्रात हुकूमत गाजविणाऱ्या राज्यातील दोनशेहून अधिक तमाशा फडांना ‘कोरोना’चा फटका बसला आहे. नवीन वर्षात हंगाम सुरु करण्यासाठी लवाजम्यासह बाहेर पडलेल्या मंगला बनसोडे यांच्या फडासह काही तमाशांचे नऊ-दहा प्रयोग होताच त्यावर काेराेनामुळे 'पडदा' पडला आहे. कवलापूर (ता. मिरज) येथील ‘काळू-बाळू’सह सर्वच फड थांबले आहेत. मंगला बनसोडे यांच्या तमाशाचा फड बीडमध्ये अडकून पडला आहे.
महाराष्ट्राचे नाव कानाकोपऱ्यात नेणारे तमाशा फड दोन वर्षे बंद आहेत. महिन्यापूर्वी यात्रा सुरु होण्याचे संकेत होते. किमान चार महिने तरी हंगाम सुरु राहणार होता. त्यामुळे फड मालकांनी पैशाची जुळणी केली. कलाकारांची जमवा-जमव करुन रंगीत तालीम सुरु केली.
मंगला बनसोडे, हरिभाऊ बडे यांच्यासह काही फड लवाजम्यासह बाहेर पडले. बीड, खान्देशात तिकिटावर खेळ केले. पण म्हणावा तसा गल्ला झालाच नाही. कोरोनामुळे बंधने आल्याने प्रेक्षकांनी पाठ फिरवली. तसेच शासनाचे निर्बंध लागू झाल्याने नऊ-दहा प्रयोग होताच तमाशावर पडदा पडला. सध्या मंगला बनसोडे फड बीड जिल्ह्यातील डोंगरकिणी गावात गेल्या चार दिवसांपासून अडकून पडला आहे. सांगलीतील दोन, साताऱ्याची एक, तर पुणे जिल्ह्यातील पाच, अशा आठ 'सुपाऱ्या' रद्द करण्याची वेळ त्यांच्यावर आली.
दोनवेळचे जेवण द्या!
यंदा हंगाम सुरु होईल, या आशेने काही फड तयारीने बाहेर पडले. काहींनी रंगीत तालीम सुरु ठेवली. पण या दहा दिवसात कोरोनाचा प्रसार वाढला आणि सर्वच फड पुन्हा बंद ठेवण्याची वेळ आली. कलाकार अडकून पडले. हाताला काम नाही. दोन वेळच जेवण द्या, पण फडातच राहतो, अशी कलाकार विनवणी करीत आहेत.
दररोजचा खर्च
- डिझेलला ३० ते ३५ हजार रुपये
- कलाकारांना शिधा २० हजार रुपये
- दोनवेळच्या जेवणासाठी सात हजार रुपये
- महिन्याचा पगार ठरल्याप्रमाणे
चित्रपट आणि नाटकाला बंदिस्त जागेत परवानगी दिली जात आहे. पण आमची लोककला जिवंत ठेवण्यासाठी शासन, लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत आहेत. दोन वर्षे फड बंद आहेत. यंदा सुरु होतील अशी अपेक्षा होती. तयारीने बाहेर पडलो. पण नुकसानच झाले. घरातून आणलेले पाच लाख रुपयेही खर्च झाले. - नितीनकुमार बनसोडे, प्रमुख, मंगला बनसोडे तमाशा मंडळ