तांदुळवाडीत हाणामारी
By admin | Published: December 29, 2016 11:48 PM2016-12-29T23:48:05+5:302016-12-29T23:48:05+5:30
क्रिकेटचा वाद : चारचाकीवर दगडफेक; लाखाचे नुकसान
कुरळप/येलूर/तांदुळवाडी : तांदुळवाडी (ता. वाळवा) येथे तांदुळवाडी व मालेवाडी येथील युवकांमध्ये तीन दिवसांपूर्वी क्रिकेटच्या सामन्यावेळी वाद झाला होता. त्याचे पर्यवसान बुधवारी धुमश्चक्रीत झाले. भांडण मिटवायला आलेल्यांमध्ये वादावादी सुरू झाल्याने मोठा वाद निर्माण झाला. बुधवारी रात्री साडेआठच्या दरम्यान हा प्रकार घडला. दरम्यान, मालेवाडीसाठी असलेल्या पाणीपुरवठा संस्थेच्या जॅकवेलचे अज्ञातांनी नुकसान केले.
याबाबत रणजित हंबीरराव खवरे (वय ३३, रा. मालेवाडी) यांनी तांदुळवाडी येथील १२ जणांविरोधात कुरळप पोलिसांत फिर्याद दिली आहे. भांडणावेळी खवरे यांच्या चारचाकी गाडीवर केलेल्या दगडफेकीत त्यांचे एक लाखाचे नुकसान झाले आहे.
तांदुळवाडी येथे तीन दिवसांपूर्वी क्रिकेट स्पर्धा झाल्या. यामध्ये मालेवाडीतील मुलांचे तांदुळवाडीच्या मुलांबरोबर भांडण झाले होते. ते भांडण मिटविण्यासाठी मालेवाडीतील रणजित खवरे मित्रासह तांदुळवाडीत बुधवारी रात्री आले होते. त्यावेळी तांदुळवाडीतील पोलिसपाटील यांचे पती राजाराम वसंत पाटील, नंदकुमार गुरव, दिग्विजय लक्ष्मण मोहिते, हर्षल अशोक पाटील, हर्षल सर्जेराव सावंत, विजय यशवंत कोळी, कृष्णात पांडुरंग पाटील, आनंदराव सखाराम पाटील (सर्व रा. तांदुळवाडी) यांनी खवरे यांच्या चारचाकी गाडीवर (एमएच १0 बीडब्ल्यू ५३११) दगडफेक केली. त्यामुळे गाडीच्या काचा फुटून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनेनंतर दोन्ही गावांमध्ये तणाव निर्माण झाला असून, कुरळप पोलिसांनी तातडीने गुन्हे दाखल केल्याने परिस्थिती नियंत्रणाखाली आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तांदुळवाडी येथील राजाराम वसंत पाटील यांना ताब्यात घेतले आहे. मालेवाडीसाठी नदीवर असलेल्या राजारामबापू पाटील सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या जॅकवेलच्या इमारतीचा दरवाजा व वायरी तोडण्यात आल्या आहेत. फ्युजही काढून नेल्या आहेत. हा प्रकार नेमका
कोणी केला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (वार्ताहर)
गाव बंदची हाक
पोलिसपाटलांचे पती राजाराम वसंत पाटील यांना कुरळप पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ तांदुळवाडी येथील त्यांच्या समर्थकांनी गुरुवारी ‘गाव बंद’ची हाक दिली होती. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवले होते. सायंकाळी सहानंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले.
तांदुळवाडी-मालेवाडी वाद जुनाच
गेल्या सहा वर्षांपासून तांदुळवाडी व मालेवाडी येथील दोन गटांत वादाचे प्रकार घडत आहेत. या ना त्या कारणावरून वादाला तोंड फुटते. त्यामुळेच तांदुळवाडी येथील स्थानिकांनी मालेवाडी येथील व्यावसायिकांना तांदुळवाडीत व्यवसाय करण्यास मज्जाव केला आहे.