आटपाडीत मागणी करूनही टँकर मिळेनात
By admin | Published: April 5, 2017 11:28 PM2017-04-05T23:28:01+5:302017-04-05T23:28:01+5:30
तालुक्यामध्ये लाल फितीचा अजब कारभार : ग्रामस्थांची मात्र पाण्यासाठी भटकंती सुरू
अविनाश बाड ल्ल आटपाडी
आटपाडी तालुक्यात अनेक गावात सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतींनी टँकरची मागणी करुन ३ महिने झाले, तरीही कार्यवाही होताना दिसून येत नाही. बेफिकीर प्रशासन यंत्रणा केवळ कागदी घोडे नाचवित आहे. टँकरचा प्रस्ताव लाल फितीत अडकून पडून, अक्षम्य वेळकाढूपणा केला जात आहे. तालुकावासीयांची मात्र पिण्याच्या पाण्यासाठी उन्हा-तान्हात रानोमाळ भटकंती सुरु आहे.
सध्या आटपाडी तालुक्यात ११ गावांसाठी टँकरने पिण्याचा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यात यंदा ३ फेब्रुवारी रोजी कौठुळी गावासाठी पहिला टँकर सुरु करण्यात आला. त्यानंतर भिंगेवाडी, उंबरगाव, पिंपरी बुद्रुक, पुजारवाडी (दिघंची), दिघंची, पिंपरी खुर्द, आंबेवाडी, माडगुळे, देशमुखवाडी, बनपुरी, बोंबेवाडी, झरे आणि विभुतवाडी या गावांना टँकरने पिण्याचा पाणी पुरवठा सुरु करण्यात आला. तालुक्यातील १७,३०१ एवढी लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी सध्या टँकरवर अवलंबून आहे. त्यासाठी सध्या ११ टँकरच्या २६ खेपा दररोज कागदोपत्री तरी केल्या जात आहेत. पण प्रत्यक्षात किती खेपा होतात, हा चौकशीचा मुद्दा आहे.
लोकांचे पाण्यासाठी अतोनात हाल सुरु असताना, प्रशासन पाणी टंचाईवर उपाययोजना करण्याबाबत किती दिरंगाई करतेय, हे विठलापूर गावाच्या प्रस्तावावरुन स्पष्ट होते. विठलापूर गावासाठी तालुक्यात दरवर्षी पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरु करावा लागतो. पण यंदा दि. २७ जानेवारी रोजी टँकरचा प्रस्ताव देऊनही आजअखेर तिथे टँकर सुरु करण्यात आलेला नाही. या गावात सध्या पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई सुरु आहे. गेल्या ४ महिन्यांपासूनच तिथे आठवड्यातून एकदा पाणी मिळत होते. सध्या तिथे महिन्यातून एकदाही पाणी मिळत नाही. लोक उन्हा-तान्हात ३-४ कि.मी.ची भटकंती करुन पिण्याचे पाणी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
विठलापूरसह आणखी १३ गावांचे प्रस्ताव पाणी टंचाईच्या लाल फितीत अडकले आहेत. आधीच ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव करण्यास वेळ लागतो. त्यानंतर तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता यांची संयुक्त पाहणी होते. त्यानंतर पाणीपुरवठा विभाग प्रस्ताव तयार करतो. मग गटविकास अधिकाऱ्यांची सही होऊन तो तहसील कार्यालयाकडे पाठविला जातो. तिथून विट्याला प्रांताधिकारी कार्यालयाला पाठविला जातो. तिथून जिल्हाधिकारी कार्यालयात जातो. तिथे मंजुरी मिळाल्यानंतर परत याच कार्यालयांच्या मार्गे प्रस्तावाचा परतीचा प्रवास घडतो. त्यामुळे खूप वेळ लागत आहे.
इकडे जीवघेण्या पाणीटंचाईने लोकांचे हाल सुरू आहेत. टंचाई जाहीर न झाल्याने सध्या जिल्हाधिकाऱ्यांना टँकर मंजुरीचे अधिकार आहेत. पण आटपाडी तालुक्यात टंचाईची भीषण वस्तुस्थिती आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रशासनाने पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी तात्काळ अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.