३६ गावे, २७९ वाड्यांवर टँकर
By admin | Published: January 18, 2016 11:14 PM2016-01-18T23:14:36+5:302016-01-18T23:34:26+5:30
जत तालुक्याचा आराखडा : दीड कोटींची गरज
जयवंत आदाटे -- जत तालुक्यातील ३६ गावे आणि त्याखालील २७९ वाड्या-वस्त्यांवर ४९ टँकरद्वारे १ लाख ९७ हजार ८० नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
जत तालुक्याची लोकसंख्या २ लाख ८० हजार असून, १२३ गावे व २७६ वाड्या आहेत. सध्या जानेवारी महिन्यात २९ गावे आणि त्याखालील २७९ वाड्या-वस्त्यांवर टँकरद्वारे एक लाखापेक्षा जादा नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. ३१ मार्च २०१६ अखेरपर्यंत तालुक्यातील १२३ पैकी ११५ गावांत टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागणार आहे. असा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार करून तालुका प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला आहे. ३१ मार्चनंतर जत शहर व परिसरातील आठ गावे वगळता संपूर्ण तालुक्यातील गावे आणि तेथील नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागणार आहे, असे येथील प्रशासनाचे मत आहे.
३१ मार्चअखेर इतकी बिकट अवस्था असेल, तर त्यापुढील एप्रिल, मे, जून या तीन महिन्यात यापेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे, अशी भीती नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. संभाव्य टंचाई कृती आराखड्यात ११५ गावे आणि त्याखालील ११६ वाड्या-वस्त्यांवर ११६ विंधन विहिरी खोदण्यात येणार आहेत. त्यासाठी २ कोटी ३२ लाख रुपये खर्च प्रास्तावित करण्यात आला आहे. ४९ गावे व त्याखालील ५६ वाड्या-वस्त्यांवरील ८२ खासगी विहिरींचे अधिग्रहण करुन नागरिकांना तात्पुरता पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी २८ लाख ५६ हजार रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. जत शहराला पाणी पुरवठा करणारे बिरनाळ (ता. जत) येथील साठवण तलाव वगळता तालुक्यात इतरत्र कोठेही यापुढील सहा महिन्यांत पाणी पुरवठा करू शकेल व पाणीसाठा उपलब्ध असणारे तलाव येथे सध्या उपलब्ध नाही. पाणी टंचाई जाणवत असलेल्या गावात शासकीय यंत्रणेकडून पाणी पुरवठा होऊ शकेल, परंतु त्यासाठी लागणारे पाणी आणि इतक्या मोठ्या प्रमाणात लागणारे टँकर उपलब्ध होणार आहेत काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. म्हैसाळ-उपसा जलसिंचन योजनेच्या मुख्य कॅनॉलमधून बिरनाळ साठवण तलावात पाणी सोडून तेथून टँकरद्वारे पाणी उचलून यापुढील पाच-सहा महिन्यांत नागरिकांना पाणी पुरवठा करता येणार आहे.
तालुक्यातील सुमारे ३८ ते ४२ हजार नागरिकांचे ऊसतोडणी कामगार म्हणून येथून प्रतिवर्षी स्थलांतर होत आहे. मार्च व एप्रिल महिन्यात ऊस गाळप हंगाम समाप्त झाल्यानंतर ते सर्वजण परत येतात. ते आल्यानंतर त्यांच्या हाताला काम देताना व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सध्या ४५ खासगी व ४ शासकीय अशा एकूण ४९ टँकरद्वारे माणसी वीस लिटरप्रमाणे पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या हिवाळा असला तरी उन्हाळ्याप्रमाणे ऊन पडत आहे. थंडी गायब झाली आहे. टँकरद्वारे मिळणाऱ्या वीस लिटर पाण्यात नागरिकांची दैनंदिन गरज पूर्ण होत नाही. त्यामुळे शासनाने माणसी चाळीस लिटरप्रमाणे पाणी पुरवठा करावा, अशी मागणी सांगली जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांनी केला आहे.
काराजनगी व गुगवाड येथील नागरिकांनी टँकरची मागणी केली आहे. त्या गावांचे आणि इतर गावातून टँकरची मागणी आल्यास तात्काळ सर्वेक्षण करून आवश्यकता असेल तेथे टँकर सुरू केला जाईल, अशी माहिती तहसीलदार अभिजित पाटील यांनी दिली.
‘म्हैसाळ’चे पाणी बिरनाळ तलावामध्ये सोडावे लागणार
जत तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाईसंदर्भात जिल्हाधिकारी यांच्यासमवेत चर्चा झाली आहे. म्हैसाळ योजनेच्या कॅनॉलमधून बिरनाळ तलावात पाणी सोडावे, अशी मागणी आम्ही केली आहे. येत्या आठवड्यात यासंदर्भात योग्य तो निर्णय होईल, अशी माहिती अभिजित पाटील यांनी दिली.
पाणी टंचाई वाढली : ११५ गावांना टँकरची गरज
जत तालुक्यात दिवसेंदिवस पाणी टंचाई वाढत आहे. १८ जानेवारी ते ३१ मार्च २०१६ अखेर एक कोटी ३२ लाख ८८ हजार रुपयांचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा जत पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तयार केला आहे. त्यामध्ये ११५ गावे, त्याखालील ६६३ वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे.