इस्लामपुरात पेट्रोल पंपावरच टँकरच्या केबिनला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:25 AM2021-03-25T04:25:55+5:302021-03-25T04:25:55+5:30
फोटो- इस्लामपूर येथील पेट्रोल पंपावर थांबलेल्या ट्रकची केबिन आगीत बेचिराख झाली. लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : इस्लामपूर-वाघवाडी रस्त्यावर असणाऱ्या ...
फोटो- इस्लामपूर येथील पेट्रोल पंपावर थांबलेल्या ट्रकची केबिन आगीत बेचिराख झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर-वाघवाडी रस्त्यावर असणाऱ्या पेट्रोल पंपाच्या आवारात उभा राहिलेल्या रासायनिक द्रव पदार्थांची वाहतूक करणाऱ्या टँकरच्या केबिनला मध्यरात्रीच्यासुमारास अचानकपणे आग लागली. यावेळी पंपावरील कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने आग विझविण्याचा शर्थीने प्रयत्न केला. शेवटी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणत तेथे घडणारा मोठा अनर्थ टाळण्यात यश मिळवले.
या आगीत टँकरची केबिन बेचिराख झाली होती. या पेट्रोल पंपाच्या परिसरात नागरी वस्ती आणि विविध दुकाने आहेत. तसेच याठिकाणी मोकळ्या जागेत अनेक वाहने उभी राहिलेली असतात. त्यातच मध्यरात्री टँकरच्या केबिनमध्ये आग लागल्याने पंपावरील कर्मचारी भेदरून गेले होते. त्यांनी आरडाओरडा करून आजूबाजूच्या नागरिकांना मदतीसाठी बोलावले. त्यानंतर आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र केबिनमधून आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट बाहेर पडत होते.
काही नागरिकांनी प्रसंगावधान राखत पालिकेच्या अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर दीपक कुंभार यांनी तातडीने बंब पाठवला. कर्मचारी नीलेश नांगरे, नामदेव खोत, सिद्धार्थ कांबळे, प्रवीण कांबळे यांनी पाण्याचा योग्य मारा करत आगीवर नियंत्रण मिळवत ती पूर्णपणे विझवली. त्यामुळे पेट्रोल पंपासह तेथील वाहने आणि नागरी वस्तीला पोहोचणारा धोका टाळण्यात यश मिळवले. या आगीत टँकरचे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.