Sangli: ‘टार्गेट’ ८५ कोटीचे, वसुली ५० कोटीची, सांगली महापालिकेसमोर करवसुलीचे आव्हान,घरपट्टी विभागाची दमछाक
By शीतल पाटील | Published: March 1, 2023 09:20 PM2023-03-01T21:20:02+5:302023-03-01T21:20:30+5:30
Sangli Municipal Corporation
- शीतल पाटील
सांगली : महापालिकेकडील घरपट्टी, पाणीपट्टीसह इतर करांच्या वसुलीचे मोठे आव्हान आहे. करवसुलीसाठी आता एकच महिना बाकी आहे. आतापर्यंत घरपट्टी विभागाने ५० कोटीची वसुली करीत निम्मा पल्ला गाठला आहे. आयुक्तांनी ८० टक्के करवसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार किमान ८५ कोटी रुपयांची वसुली अपेक्षित आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरू आहे.
कोरोना, महापुरामुळे दोन ते तीन वर्षे महापालिकेने करवसुलीबाबत नरमाईची भूमिका घेतली होती. त्यामुळे थकबाकीचा आकडा वाढला आहे. घरपट्टी विभागाची चालू मागणी व थकबाकी दरवर्षी ७० ते ७२ कोटीच्या आसपास होती. पण आता ती ११० कोटीपर्यंत पोहोचली आहे. पाणीपट्टीच्या कराची अवस्थाही तशीच आहे. त्यामुळे यंदा आयुक्त सुनील पवार यांनी सर्वच विभागाला करवसुलीचे उद्दिष्ट निर्धारित करून दिले आहे. त्यात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार थांबविण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे घरपट्टी, पाणीपट्टी, आरोग्य विभागातील कर्मचारी सुट्टी दिवशीही करवसुलीसाठी दारोदारी फिरत आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा घरपट्टी विभागाने वसुलीत आघाडी घेतली आहे. गेल्या वर्षी मार्चअखेर ४९ कोटी ८१ लाख रुपयांची वसुली झाली होती. फेब्रुवारीअखेरपर्यंत ४९ कोटी ४० लाख रुपयांची वसुली केली आहे. अजून एक महिना शिल्लक आहे. या महिन्यात ३५ कोटी रुपये वसुलीचे आव्हान घरपट्टी विभागासमोर आहे. थकबाकी वसुलीसाठी घरपट्टी विभागाने जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत. शिवाय पाणी कनेक्शन तोडण्याची कारवाईही हाती घेतली आहे.
उपयोगकर्ता करातून साडेसात कोटी
उपयोगकर्ता करातून घरपट्टी विभागाला ७ कोटी ६१ लाख रुपये मिळाले आहेत. गतवर्षी या करातून ७ कोटी २० लाख तर २०२०-२१ मध्ये ७ कोटी ५६ लाखांची वसुली झाली होती.
घरपट्टीची वसुली
२०२०-२१ : ५२.३६ कोटी
२०२१-२२ : ४९.८१ कोटी
२०२२-२३ : ४९.४० कोटी (फेब्रुवारीअखेर)