तासगावात चुरशीने व शांततेत ७९.८१ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:31 AM2021-01-16T04:31:53+5:302021-01-16T04:31:53+5:30
आमदार व खासदार यांनी ही निवडणूक गावोगावचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर सोपवल्याने इतर निवडणुकांप्रमाणे दिसणारी चुरस बघायला मिळाली नाही. मात्र, ...
आमदार व खासदार यांनी ही निवडणूक गावोगावचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर सोपवल्याने इतर निवडणुकांप्रमाणे दिसणारी चुरस बघायला मिळाली नाही. मात्र, त्याच त्या चेहऱ्यांना वैतागल्याने गावोगावी मतदारांच्यात मतदानाबाबत निरुत्साह दिसून आला. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मतदारांना आणण्यासाठी धडपड करताना दिसत होते.
तासगाव तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. सकाळपासून उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते मतदान केंद्राच्या परिसरात ठिय्या मारून बसल्याचे चित्र सगळीकडे पाहायला मिळाले. मांजर्डे, सावळज, येळावी, कवठेएकंद, बोरगाव ढवळी, तुरची या गावांत काटा लढतीचे चित्र पाहायला मिळाले.
सकाळच्या सत्रात १२ वाजेपर्यंत ३० टक्के मतदान झाले. दुपारी दीड वाजता ते ५० टक्के तर अंतिम ७९.८१ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली होती. उन्हामुळे दुपारच्या सत्रात काही मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी दिसून आली. मात्र, ५ नंतर अंतिम टप्प्यात मतदारांनी रांगा लावून मतदान केले.
तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या नेतृत्वाखाली क्षेत्रिय अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या तत्परतेमुळे किरकोळ अपवाद वगळता मतदान केंद्रांवर कोणत्याही तक्रारी प्राप्त झाल्या नाहीत. तासगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी मतदान केंद्र परिसर व प्रत्येक गावात चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न होता मतदान शांततेत पार पडले. दिव्यांग मतदारांनी एकत्रित येत मतदानाचा हक्क बजावला. अंध मतदारांनी ब्रेल लिपीद्वारे मतदान केले. प्रशासनाने मतदारांची ने-आण करण्याची व्यवस्था केली होती.
चौकट
गावनिहाय मतदानाची टक्केवारी
आळते ८२, बोरगाव ७७, दहिवडी ८०, खालसा धामणी ७३, ढवळी ८२, धोंडेवाडी ८५, धुळगाव ८४, डोंगरसोनी ८१, डोर्ली ८५, गव्हाण ७९, गोटेवाडी ८७, गौरगाव ८१, हातनोली ७८, हातनूर ७८, जरंडी ८१, जुळेवाडी ७९, कवठेएकंद ८१, लोढे ८३, मांजर्डे ७९, मोराळे (पेड) ८१, नागावकवठे ८६, निंबळक ८१, पाडळी ७४, पेड ७४, राजापूर ८३, सावळज ७५, सिद्धेवाडी ७३, शिरगाव (वि) ८०, तुरची ८५, वज्रचौंडे ८५, विजयनगर ७९, विसापूर ७०, वडगाव ८३, वाघापूर ८४, यमगरवाडी ८०, येळावी ८१
चौकट :
सचिन पाटील - मोहन पाटील लढत लक्षवेधी
तासगाव तालुक्यात सर्वाधिक लक्षवेधी मांजर्डे येथील प्रभाग-१ मधील निवडणूक ठरली. या प्रभागात काका गटाकडून सचिन पाटील, आबा गटाकडून मोहन पाटील असे दोन मातब्बर उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे या लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रभागात १०५० पैकी ९८२ मतदान झाले आहे.