तासगावात भाजपच्या सदस्यांनी कर्मचाऱ्यांना घातले कोंडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:21 AM2021-06-05T04:21:09+5:302021-06-05T04:21:09+5:30

तासगाव : तालुक्यातील कवठेएकंद, नागाव (कवठे) येथील ग्रामसेवक शासकीय वेळेत ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित नसतात. त्यामुळे नागरिकांची कामे वेळेत होत ...

In Tasgaon, BJP members locked the employees | तासगावात भाजपच्या सदस्यांनी कर्मचाऱ्यांना घातले कोंडून

तासगावात भाजपच्या सदस्यांनी कर्मचाऱ्यांना घातले कोंडून

Next

तासगाव : तालुक्यातील कवठेएकंद, नागाव (कवठे) येथील ग्रामसेवक शासकीय वेळेत ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित नसतात. त्यामुळे नागरिकांची कामे वेळेत होत नाहीत. गावच्या विकासावर परिणाम होत आहे. याबाबत पंचायत समिती प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही, असा आरोप करून संतप्त झालेल्या भाजपचे पंचायत समिती सदस्य संतोष आठवले यांनी ग्रामपंचायत विभागाला टाळे ठोकले.

तीन विस्तार अधिकारी, एक ग्रामसेवक व एक शिपाई अशा पाच जणांना सुमारे तासभर कोंडून घातले. यामुळे काही काळ पंचायत समितीत तणाव निर्माण झाला. कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत काम बंद करून गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. अखेर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे यांच्या मध्यस्थीने वाद मिटवण्यात आला.

कवठेएकंद, नागाव (कवठे) येथील ग्रामसेवक आपल्या कार्यालयात वेळेवर हजर नसतात. पंचायत समिती सदस्यांचा फोन उचलत नाहीत. वैद्यकीय रजा काढून इतरत्र फिरत असतात. त्यामुळे गावच्या विकासकामांवर, नागरिकांच्या विविध कामावर परिणाम होत आहे, असा आरोप करून आठवले यांनी पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या; मात्र कारभारात सुधारणा होत नसल्यामुळे आठवले यांनी शुक्रवारी ग्रामपंचायत विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकले.

विस्तार अधिकाऱ्यांना उद्देशून ''कवठेएकंद, नागाव (कवठे) येथे ग्रामसेवक शासकीय वेळेत उपस्थित नसतात. आमचा फोनही ते उचलत नाहीत. वैद्यकीय रजेचा अर्ज देऊन ते इतरत्र फिरत असतात. रजेच्या काळात गावाला दुसरा ग्रामसेवक मिळाला नाही. मी ग्रामपंचायत विभागाला कुलूप ठोकणार आहे'', असे सांगून सर्वांना कार्यालयाच्या बाहेर होण्यास सांगितले. तेथे बसलेल्या विस्तार अधिकारी पी. के. सुतार, ए. के. पाटील, के. आर. पाटील, ग्रामसेवक सुभाष शिंदे व शिपाई अभय शिंदे यांनी ''आम्ही शासकीय कर्मचारी आहोत. आम्ही कसे कार्यालय सोडून बाहेर जाणार. तुमचा जो काय विषय आहे तो गटविकास अधिकाऱ्यांशी बोला. आपण चर्चेने मार्ग काढू'', असे सांगितले. त्यानंतर आठवले यांनी या कार्यालयाला टाळे ठोकले.

याचवेळी सभापती शेंडगे पंचायत समितीत आले. त्यांच्या मध्यस्थीने कोंडून घातलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची सुटका केली. त्यानंतर उपसभापती डॉ. शुभांगी पाटील यांच्या दालनात गटविकास अधिकारी दीपा बापट, सदस्य आठवले यांच्यासह ग्रामपंचायत विभागातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत शेंडगे यांनी अधिकारी - पदाधिकारी यांच्यात समझोता घडवून वादावर पडदा टाकला.

चौकट

या प्रकारामुळे पंचायत समिती आवारात प्रचंड गोंधळ झाला. गटविकास अधिकारी दीपा बापट याही आक्रमक झाल्या. सदस्यांचे हे वागणे बरोबर नाही. कोणत्याही विषयावर सदस्यांनी चर्चा करून मार्ग काढायला पाहिजे, अशी भूमिका घेतली. याचवेळी पंचायत समितीचे सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी व्हरांड्यात आले. आठवले यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली.

Web Title: In Tasgaon, BJP members locked the employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.