तासगाव : ठेकेदाराची निविदा तासगावात पळविली, : भाजप नगरसेवकाला धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 01:33 AM2018-09-26T01:33:39+5:302018-09-26T01:36:23+5:30
तासगाव नगरपालिकेच्या सुमारे साडेतीन कोटींच्या विकास कामांसाठी निविदा दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. कवठेमहांकाळ तालुक्यातील एक ठेकेदार पालिकेत निविदेची कागदपत्रे जमा करण्यासाठी आला होता.
तासगाव : तासगाव नगरपालिकेच्या सुमारे साडेतीन कोटींच्या विकास कामांसाठी निविदा दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. कवठेमहांकाळ तालुक्यातील एक ठेकेदार पालिकेत निविदेची कागदपत्रे जमा करण्यासाठी आला होता. यावेळी शहरातीलच काही ठेकेदारांनी या ठेकेदाराची निविदाच पळवून नेण्याचा कारनामा केला. इतकेच नव्हे, तर या प्रकारातून तिथे उपस्थित असलेल्या भाजपच्या एका नगरसेवकालादेखील धक्काबुक्की झाल्याची चर्चा आहे.
तासगाव शहरात साडेतीन कोटींच्या, १२ कामांसाठी पालिकेकडून निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या कामांची आॅनलाईन निविदा दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर, दाखल केलेल्या निविदांची पालिकेत कागदोपत्री प्रत्यक्ष पूर्तता (फिजिकल सबमिशन) करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता.
बहुतांश ठेकेदारांनी संबंधित कामांची निविदा पालिकेत जमा केली होती. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कवठेमहांकाळ तालुक्यातील एक ठेकेदार निविदा दाखल करण्यासाठी आला होता. यावेळी तिथे उपस्थित शहरातील ठेकेदारांनी संबंधित ठेकेदार निविदा दाखल करण्यापूर्वीच त्याच्या हातातील निविदा पळवून नेण्याचा कारनामा केला. हा प्रकार तिथे उपस्थित असणाऱ्या भाजपच्या एका नगरसेवकाच्या लक्षात आला. त्याने याचा जाब ठेकेदारांना विचारला. यावेळी या नगरसेवकात आणि ठेकेदारांच्यात जोरदार बाचाबाची झाली.
या ठेकेदारांनी नगरसेवकाला धक्काबुक्कीदेखील केल्याची चर्चा पालिकेत सुरु होती. निविदा दाखल करण्याची मुदत संपल्यामुळे कवठेमहांकाळच्या ठेकेदाराला नंतर निविदा दाखल करता आली नाही. मात्र ठेकेदारीवरुन पालिकेत झालेल्या खडाजंगीची आणि सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकाला, भाजपशी संबंधित ठेकदारांकडूनच झालेल्या धक्काबुक्कीची शहरात जोरदार चर्चा सुरु होती.
‘तो’ ठेकेदार नगरसेविकेचा भाचा
शहरातील विकास कामांची निविदा शहरातीलच सत्ताधाºयांशी संबंधित ठेकेदारांनी घ्यायची, असा अलिखित नियम सत्ताधाºयांकडून करण्यात आला आहे. मात्र यावेळी प्रभाग सातमधील उद्यान सुशोभिकरण आणि संरक्षक भिंतीच्या २३ लाख रुपयांच्या कामासाठी कवठेमहांकाळमधील ठेकेदाराने आॅनलाईन निविदा दाखल केली होती. हा ठेकेदार सत्ताधारी भाजपच्याच एका नगरसेविकेचा भाचा आहे. त्यामुळेच त्याने निविदा दाखल करून मंगळवारी तो फिजिकल सबमिशनसाठी आला असताना, निविदा पळवापळवीचा प्रकार झाला. त्यामुळे सत्ताधाºयांतील ठेकेदारी चांगलीच चर्चेत आली आहे.