सांगलीतील पुष्प प्रदर्शनात तासगावच्या गुलाबाला ‘किंग ऑफ द शो’चा मान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 07:57 PM2017-09-23T19:57:02+5:302017-09-23T19:57:44+5:30
निसर्गाचे सर्व रंग सामावून घेत नटलेल्या असंख्य फुलांची मैफल शनिवारी सांगलीच्या मराठा समाज भवनात रंगली.
सांगली : निसर्गाचे सर्व रंग सामावून घेत नटलेल्या असंख्य फुलांची मैफल शनिवारी सांगलीच्या मराठा समाज भवनात रंगली. टवटवीत फुलांच्या संमोहित, सुगंधित विश्वात रमण्यासाठी शेकडो पुष्पप्रेमींनी हजेरी लावली. विविध गटातील पुष्परचना, फुलांची रांगोळी, फुलांचे देखाव्यांनी हे प्रदर्शन सजले आहे. दि सांगली रोझ सोसायटी आणि मराठा समाजाच्यावतीने सांगलीत शनिवारपासून चाळिसाव्या गुलाब पुष्पप्रदर्शनाला शनिवारी सुरुवात झाली. दोन दिवस हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
गुलाब, जर्बेरा, कार्निशियन, कॉला लिली, ऑर्किड, अॅन्थोरियम, सिमोडियम, हायड्रेनजिआ, लिलियम आदी फुलांच्या रचना येथे आहेत. फुलांनी सजविलेली बाहुली, पक्षी, तलाव यांचा देखावाही लक्षवेधी ठरत आहे. पुष्परचनेबरोबरच फुलांच्या रांगोळ्यांनीही प्रदर्शनात रंग भरला आहे. उद्घाटनानंतर दुपारपासून पुष्पप्रेमी नागरिकांनी प्रदर्शनाच्या ठिकाणी गर्दी केली होती. दिवसभर ही गर्दी कायम होती. फुलांच्या विश्वात रमतानाच फुलांसोबत, देखाव्यांसोबत सेल्फी घेण्याचा मोह प्रत्येकाला होत होता.
तासगावच्या गुलाबाची बाजी
यंदा स्पर्धेत मोठी चुरस निर्माण झाली होती. तासगाव येथील सुरेश माईणकर यांचा गुलाब ‘किंग ऑफ द शो’चा मानकरी ठरला. ‘क्विन ऑफ द शो’चा मान कोंडिग्रे येथील श्रीवर्धन बायोटेकच्या गुलाबास, ‘प्रिन्स ऑफ द शो’चा मान जयसिंगपूर येथील संजय घोडावत ग्रुपच्या फुलास, तर ‘प्रिन्सेस ऑफ द शो’चा मान कुंडलच्या फॉरेस्ट अॅकॅडमीच्या गुलाबास मिळाला.
स्पर्धेचा निकाल
डिस्प्ले स्पर्धेत संजय घोडावत ग्रुपला प्रथम, तर कोंडिग्रे येथील श्रीवर्धन बायोटेकला द्वितीय बक्षीस मिळाले. फूल विक्रेत्यांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत जॅपनीज फ्लॉवरीस्टने सर्व बक्षिसे पटकावली. ग्लॅडिएटर स्पर्धेत तासगावच्या रवींद्र माईणकर यांना प्रथम, संजय घोडावत ग्रुपला द्वितीय, शिरढोणच्या जॉली बोर्ड लिमिटेडला तृतीय क्रमांक मिळाला. ग्रीन हाऊसमधील गुलाब स्पर्धेत कोंडिग्रेच्या श्रीवर्धन बायोटेकला प्रथम व तृतीय, तर संजय घोडावत ग्रुपला द्वितीय क्रमांक मिळाला. जर्बेरा स्पर्धेत श्रीवर्धन बायोटेकने प्रथम, द्वितीय, तर घोडावत ग्रुपने तृतीय क्रमांक मिळविला. कार्नेशन विभागात तिन्ही बक्षिसे घोडावत ग्रुपने पटकाविली. सर्वांसाठीच्या पुष्परचनेत बेळगावच्या संस्कृती पाटील, कांचन सुतार आणि मीनाक्षी ढेमरे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळाला. पंधरा वर्षाच्या आतील मुलांसाठी आयोजित पुष्परचना स्पर्धेत निया चव्हाण, तन्वी नाईक व तिर्थेश पाचोरे यांनी अनुक्रमे बक्षिसे मिळविली. मतिमंद मुलांसाठीच्या पुष्परचना स्पर्धेत सचिन गडदे, निखिल पोळ, मानसी विपट यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, तर तन्वी पाटील, मयुरी हराळे यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.
लक्षवेधी तंतुवाद्ये
पुष्पप्रदर्शनाच्या दर्शनी बाजूलाच विविध वाद्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. सुमारे ७० वर्षांपूर्वीची दुर्मिळ तंतुवाद्ये ठेवण्यात आली होती. मिरजेच्या काशिद मेहमूद सतारमेकर यांच्या तंतुवाद्य केंद्रातील ही वाद्ये आहेत. यामध्ये सारंगी, सरस्वती वीणा, मयूर वीणा, पाय-पेटी, तंबोरा, दिलरुबा, सौर मंडल, सूर सिंगार, बासरी आदी वाद्यांचा समावेश आहे. यातील दिलरुबा हे तंतुवाद्य घोड्यांच्या केसाच्या ‘गच’ने वाजविले जात होते, तर सारंगीच्या स्वरकंपनासाठी बोकडाची कातडी वापरली आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटात वापरलेला तंबोराही येथे आहे.