सांगली: तासगावच्या ऐतिहासिक रथोत्सवास उत्साहात प्रारंभ, सनई-चौघडे, मोरयाऽऽ’च्या गजरात भाविक तल्लीन

By श्रीनिवास नागे | Published: September 1, 2022 04:08 PM2022-09-01T16:08:52+5:302022-09-01T16:29:12+5:30

‘मोरयाऽ... मोरयाऽऽ’च्या गजरात तल्लीन झालेल्या भाविकांनी जोशात रथ ओढण्यास सुरुवात केली.

Tasgaon historic Rath Festival begins with enthusiasm | सांगली: तासगावच्या ऐतिहासिक रथोत्सवास उत्साहात प्रारंभ, सनई-चौघडे, मोरयाऽऽ’च्या गजरात भाविक तल्लीन

सांगली: तासगावच्या ऐतिहासिक रथोत्सवास उत्साहात प्रारंभ, सनई-चौघडे, मोरयाऽऽ’च्या गजरात भाविक तल्लीन

Next

तासगाव : मंगलमुर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, ‘मोरयाऽ मोरयाऽऽ’चा गजर, गुलाल-पेढे-खोबऱ्याची उधळण, जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या भाविकांच्या भक्तिरसातून उत्साहाला आलेले उधाण अशा अशा चैतन्यपूर्ण वातावरणात कोरोनाचे विघ्न टळल्याने दोन वर्षानंतर तासगावचा ऐतिहासिक २४३ वा रथोत्सव आज, गुरुवारी जल्लोषात सुरुवात झाली.

श्री गणपती पंचायतनच्या विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पटवर्धन राजवाड्यातून छबिना बाहेर पडला. त्यात राजेंद्र पटवर्धन यांच्यासह मानकरी सहभागी झाले होते.

श्री गणपती मंदिरातील १२१ किलो वजनाची पंचधातूंची श्रींची उत्सवमूर्ती पालखीतून मंदिराबाहेर रथापर्यंत आणण्यात आली. रथाच्या मध्यभागी उत्सवमूर्ती विराजमान झाल्यानंतर प्रथेप्रमाणे श्रींची आरती झाली. यावेळी रथापुढे असणाऱ्या गणेशभक्तांनी ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ’ची घोषणा दिली.

रथाचे दोरखंड हातात घेऊन भाविकांनी रथ ओढण्यास प्रारंभ केला. ‘मोरयाऽ... मोरयाऽऽ’च्या गजरात तल्लीन झालेल्या भाविकांनी जोशात रथ ओढण्यास सुरुवात केली. काही फूट पुढे गेल्यानंतर ओंडक्याच्या साहाय्याने रथ थांबविण्यात येत होता. काही वेळ विश्रांती व पुन्हा ‘मोरयाऽऽ’चा गजर करीत भाविकांनी श्री काशीविश्वेश्वराचे मंदिर गाठले. रथापुढे हत्ती, सनई-चौघडे होते. काही तरुणानी लक्षवेधी ऊंच मनोरे ऊभा करुण जयघोष केला.

प्रथेप्रमाणे श्री गणपती मंदिरापुढे असणाऱ्या श्री काशीविश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत रथ ओढण्यात येतो. श्री शंकर व श्री गणपती या पिता-पुत्रांची भेट होते व रथ परतीच्या प्रवासाला लागतो. त्याप्रमाणे श्री काशीविश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत रथ गेल्यानंतर तेथे श्रींची आरती झाली व रथाचा परतीचा प्रवास सुरू झाला.

Web Title: Tasgaon historic Rath Festival begins with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.