आमदार सुमनताईंचे सांगलीत उपोषण सुरु, पुत्र रोहितही आंदोलनात
By संतोष भिसे | Published: October 2, 2023 03:38 PM2023-10-02T15:38:32+5:302023-10-02T15:40:00+5:30
मतदारसंघातील आठ गावांचा टेंभू सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी
सांगली : दिवंगत आमदार आर. आर. पाटील यांच्या पत्नी आमदार सुमनताई यांनी सोमवारपासून सांगलीत उपोषण सुरु केले. त्यांचे पुत्र रोहित हे देखील आंदोलनात सहभागी झाले आहेत. तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघातील गावांचा टेंभू सिंचन योजनेत समावेश करावा यासाठी उपोषण सुरु केले आहे.
आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मतदारसंघातून मोठ्या संख्येने समर्थक सांगलीत दाखल झाले आहेत, त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आवार सुट्टीदिवशीही गर्दीने फुलून गेले आहे. टेंभू पाणी योजनेच्या विस्तारित योजनेच्या प्रशासकीय मान्यतेवरून सांगलीत राजकारण तापले आहे. आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी पाण्यासाठी उपोषणास्त्र उपसल्यानंतर आमदार अनिल बाबर विस्तारित योजनेसाठी थेट मंजूरी आणली. पण तसे प्रशासकीय पत्र मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा निर्णय आमदार पाटील यांनी घेतला आहे.
सिंचन योजनेच्या आठ टीएमसी पाण्यासाठी आंदोलनाचा निर्णय आठवडाभरापूर्वी जाहीर केला होता. त्यानंतर मुंबईत वेगाने घडामोडी घडल्या. शासनाने मागणीला मंजुरी दिली. त्यानंतरही आमदार पाटील आंदोलनावर ठाम राहिल्या. पत्र मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांचे विरोधक खासदार संजय पाटील यांनी मंजुरी मिळाल्याने उपोषण निरर्थक झाल्याची टिका केली होती. मुलगा रोहित याच्या भवितव्यासाठी आमदार सुमनताई उपोषण करत असल्याची टिका केली होती. ही सर्व चर्चा व टीकाटिप्पणी रोहित पाटील यांनी फेटाळून लावत आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका घेतली आहे.
सुमनताई म्हणाल्या, शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसू नये. कामाला मंजुरी मिळाली आहे, तर काम कधी सुरू करणार ? ते लेखी द्यावे. टेंभूच्या विस्तारासाठी गेल्या वर्षभरात चारवेळा शासनाला मी पत्रे दिली. त्याची दखल घेत शासनाने मंजुरीचा निर्णय घेतला. आता प्रत्यक्ष पत्राची प्रतीक्षा आहे. आमचे आंदोलन यशस्वी झाले आहे. आंदोलनामुळेच शासनाला पाणी आरक्षित करावे लागले. शेतकऱ्यांचा प्रश्न असतानाही केवळ राजकारणासाठी मान्यतेला इतकी वर्षे विलंब करण्यात आला.
रोहित पाटील म्हणाले, शासनाने आता फक्त मान्यता देऊन थांबू नये, कामाला सुरुवात करावी. सावळजसह आठ गावे अनेक वर्षांपासून टेंभूच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या गावातील शेतकरीही आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामध्ये सावळज, सिद्धेवाडी, दहीवडी, जरंडी, वायफळे, यमगरवाडी, बिरणवाडी आणि डोंगरसोनी या गावांचा समावेश आहे. शासनाने अतिरिक्त आठ टीएमसी पाणी उपलब्ध करून दिल्यानंतर आता टेंभू योजनेचा तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता अहवाल सादर केला आहे. त्यासाठी ७ हजार २१० कोटी रुपये निधीची आवश्यक आहे.
आंदोलनात ताजुद्दीन तांबोळी, हणमंतराव देसाई, सुरेश पाटील यांच्यासह मतदारसंघातून लोकप्रतिनिधी सहभागी झाले. वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनीही प्रत्यक्ष उपस्थित राहत पाठिंबा दिला.