तासगाव-कवठेमहांकाळ शिवसेना सोडणार नाही
By admin | Published: July 10, 2014 11:15 PM2014-07-10T23:15:34+5:302014-07-10T23:17:05+5:30
दिवाकर रावते : कार्यकर्त्यांचा मेळावा
कवठेमहांकाळ : कोणत्याही परिस्थितीमध्ये तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघ शिवसेना सोडणार नाही. येथून निष्ठावंत शिवसैनिकालाच उमेदवारी दिली जाईल, अशी माहिती शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख दिवाकर रावते यांनी आज (गुरुवार) कवठेमहांकाळ येथे आयोजित शिवबंधन मेळाव्यात केले.
रावते म्हणाले की, स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेणाऱ्या शरद पवारांनी राज्यातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावले. केंद्रीय कृषिमंत्री असताना त्यांच्या काळात राज्यातील तेरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हजारो कोटींच्या सिंचन घोटाळ्यात प्रत्यक्ष सहभाग आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या सुख-दुखाशी काहीही देणे-घेणे नाही. जयंत पाटील यांनी राजू शेट्टींविरोधात लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार देत पळ काढला. त्यांच्याच मतदार संघात उध्दव ठाकरे यांचा मेळावा होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करू.
पतंगराव कदम यांनी पुत्रप्रेमापोटी कडेगाव, पलूसमधील सुमारे सव्वालाख मतदारांची नावे पुणे लोकसभा मतदार संघात नोंदविली. मात्र त्यांना पुणेरी जनतेने चांगलाच हिसका दाखविला. आता काँग्रेस, राष्ट्रवादीच्या या भ्रष्ट सरकारचा पाडाव करण्याची वेळ आली असून, त्यासाठी शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे आणि विधानसभेवर पुन्हा भगवा फडकवावा, यासाठी रात्रीचा दिवस करावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य पाटील, तालुका शिवसेना प्रमुख दिनकर पाटील यांचीही भाषणे झाली. जिल्हा संघटक सुवर्णा मोहिते, ज्ञानेश्वर चव्हाण, बाबूराव दुधाळ, नितीन काळे, विशाल रजपूत, अनिल बाबर, दिलीप गिड्डे, विजय डुबुले यांच्यासह तासगाव, जत, कवठेमहांकाळ आदी तालुक्यातील शिवसैनिक, कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)