तासगाव नगराध्यक्षांची ९ ला निवड
By admin | Published: April 27, 2016 10:30 PM2016-04-27T22:30:37+5:302016-04-28T00:15:54+5:30
अविनाश पाटील दावेदार : सोमवारपासून अर्ज दाखलची प्रक्रिया
तासगाव : तासगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर, निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुभाष बोरकर यांनी नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम बुधवारी जाहीर केला. त्यानुसार भाजपच्या तिसऱ्या नगराध्यक्षाची निवड ९ मे रोजी होणार असून, नगरसेवक अविनाश पाटील नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार आहेत.
पाच महिन्यांपूर्वी पालिकेतील सत्तेचे समीकरण बदलले. पालिकेत भाजपची आणि पर्यायाने खासदार संजयकाका पाटील गटाची एकहाती सत्ता आली. पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादीतून आलेल्या सुशिला साळुंखे यांना दोन महिन्यांसाठी नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली. त्यानंतर बाबासाहेब पाटील यांच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ पडली.
बाबासाहेब पाटील यांचा तीन महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर, त्यांनीही नगराध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. पाटील यांच्या राजीनाम्यानंतर नव्या नगराध्यक्षाची उत्सुकता आहे. मात्र मागील नगराध्यक्ष निवडीवेळीच बाबासाहेब पाटील आणि अविनाश पाटील यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु होती.
त्यामुळे यावेळी नगराध्यक्ष पदाच्या इच्छुकांत चार-पाच नावे असली तरी, अविनाश पाटील यांना नगराध्यक्ष पदाची संधी निश्चित मानली जात आहे. मात्र खासदार संजयकाकांच्या निर्णयानंतरच अधिकृतरित्या याबाबत शिक्कामोर्तब होणार आहे.
सहा महिन्यांच्या कालावधित भाजपचा तिसरा नगराध्यक्ष होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी कोणाची वर्णी लागणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)