तासगाव पालिकेचा बेलगाम कारभार
By admin | Published: March 17, 2017 11:36 PM2017-03-17T23:36:45+5:302017-03-17T23:36:45+5:30
नगराध्यक्षांकडून बदलाची अपेक्षा : निकृष्ट कामे, टक्केवारीचा पायंडा, भाजपकडून ४0 कोटींच्या कामांचे मार्के टिंग
दत्ता पाटील ल्ल तासगाव
तासगाव नगरपालिकेत मागील पाच वर्षात कोट्यवधींची विकासकामे झाली. सत्ताधाऱ्यांकडून निवडणुकीच्या काळात या कामांचे मार्केटिंग करण्यात आले. मात्र या कामांचा प्रभाव उलटा झाला. विकासापेक्षा टक्केवारी आणि निकृष्ट कामांनी विकास डागाळला गेला. नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सभेत तब्बल सव्वादोन कोटीच्या नवीन कामांना मंजुरी मिळाली आहे. मात्र पालिकेतील टक्केवारीच्या बेलगाम कारभारामुळे कामाच्या दर्जाबाबत सातत्याने प्रश्न निर्माण होत आहे. हा कारभार बदलण्यासाठी नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत यांच्याकडून बदलाची अपेक्षा असून, निकृष्ट कामे आणि टक्केवारीचा पायंडा मोडीत निघून पारदर्शी कारभाराची अपेक्षा व्यक्त होत आहे.
तासगाव नगरपालिकेचे नाव चर्चेत आले की, विकास कामांपेक्षा टक्केवारी आणि कारभाऱ्यांची ठेकेदारी असेच चित्र यापूर्वीच्या काळात पाहायला मिळाले आहे. सत्ता कोणाचीही असली तरी, मक्ता मात्र कारभाऱ्यांचाच, असाच कारभार सातत्याने झाला. सत्ताधारी आणि विरोधकांकडून कामे वाटून ‘मिल बांट के खाओ’च्या कारभाराचे अनेक नमुने यापूर्वी चव्हाट्यावर आले. काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तेतून पायउतार झाल्यानंतर, खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे कारभारी सत्तेत आले. त्यानंतर तर कामे घेण्यावरुन आणि टक्केवारीवरुन भाजपांतर्गत महाभारतापासून मुख्याधिकाऱ्यांच्या घरावर दगडफेक करण्यापर्यंत अनेक घडामोडी झाल्या.
पालिकेच्या निवडणुकीच्या काळात भाजपकडून ४० कोटींपेक्षा जास्त रकमेच्या विकास कामांचे मार्केटिंग करण्यात आले होते. मात्र या कामांपेक्षा, कामातून झालेल्या बदनामीमुळे, विकास कामांचे श्रेय घेऊनदेखील त्याचा नकारात्मक परिणाम मतपेटीतून पाहायला मिळाला. निकृष्ट दर्जाची विकासकामे, रखडलेली कामे, ठेकेदार नगरसेवक, टक्केवारीसाठी कुरघोड्या अशा एक ना अनेक भानगडींमुळे तत्कालीन सत्ताधाऱ्यांकडून पालिकेची लक्तरे वेशीवर मांडण्याचे काम झाले. पण कोट्यवधींचा खर्च होऊनही प्रत्यक्ष विकासात अपयश आले.
बऱ्याच उलथापालथीनंतर पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली. नव्या कारभाऱ्यांच्या काळात चार दिवसांपूर्वी झालेल्या सभेत तब्बल २ कोटी ३० लाख रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र यांचा कारभारही पुन्हा ये रे माझ्या मागल्या असाच राहील. नगराध्यक्ष डॉ. सावंत यांच्याकडून विकासाच्या मोठ्या अपेक्षा आहेत. किंंबहुना नव्याने होणाऱ्या कामांचा दर्जा चांगला असावा, कारभार पारदर्शी असावा, अशा अपेक्षा आहेत. टक्केवारी, ठेकेदारी मोडीत काढून कारभार झाला तरच गुणवत्तापूर्ण विकास होणे शक्य आहे.