तासगाव : खासदारांच्या शिलेदारांची लोकसभेसाठी मोर्चेबांधणी- विधानसभा मतदारसंघाबाहेरही महोत्सवाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:14 AM2019-01-04T00:14:58+5:302019-01-04T00:19:17+5:30
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच, खासदार संजयकाका पाटील यांनी मतदारसंघात संपर्क वाढवला आहे. दुसरीकडे त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून
दत्ता पाटील ।
तासगाव : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच, खासदार संजयकाका पाटील यांनी मतदारसंघात संपर्क वाढवला आहे. दुसरीकडे त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खासदार महोत्सवाच्या माध्यमातून जिल्हाभर कार्यक्रम आयोजित करून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
खासदार संजयकाका पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी, त्यांच्या अतिशय जवळच्या नेत्यांनी त्यांच्या गटाला रामराम केला होता. त्यावेळी संजयकाकांच्या राजकीय अस्तित्वाबाबतही चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र मोदी लाटेवर स्वार होत संजयकाकांनी भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभेचे तिकीट मिळवले. काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करून खासदारकी मिळवली.
साडेचार वर्षांत भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांची मर्जी मिळवून जिल्ह्यात विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे, तर कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असणाऱ्या कृष्णा खोरे महामंडळावर वर्णी लागली. खासदारांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलत गेली.
खासदार पाटील यांनी सत्तेवर स्वार होत, जिल्हाभर कार्यकर्त्यांचे जाळे विणले. त्यामुळे जेजेपी बासनात गुंंडाळली गेली, किंबहुना जयंत पाटील यांनाच थेट आव्हान निर्माण झाले.
अवघ्या काही वर्षातच जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी खासदार पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. अर्थात राजकीय आलेख चढता असतानाच पक्षांतर्गत विरोधकांचे आव्हानही खासदार पाटील यांच्यासमोर आहे. मात्र पक्षश्रेष्ठींची मर्जी असल्याने हे आव्हान कितपत टिकेल? हा प्रश्न आहे.
दुसरीकडे पाटील यांनी खासदारकी मिळाल्यानंतर केवळ तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा क्षेत्रापुरते कार्यक्षेत्र मर्यादीत न ठेवता, जिल्हाभर जनसंपर्क ठेवला. त्यामुळे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी खासदारांचे वलय झाले आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून तासगाव, कवठेमहांकाळच्या बाहेरही अनेक ठिकाणी खासदार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने खासदारांच्या शिलेदारांनी लोकसभेची जोरदार मोर्चेबांधणी केल्याचे चित्र आहे.
नेत्यांच्या संबंधाची चर्चा
सुरुवातीच्या काळात राष्टवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि खासदार संजयकाका पाटील यांची सलगी होती.दोघांचेही राजकारण एकमेकांच्या अंडरस्टॅँडिंगने सुरू होते. किंबहुना जेजेपी पॅटर्नची चर्चा होताना या दोन्ही नेत्यांचे राजकीय संबंध चर्चेत येत होते.