Sangli Politics: रोहित पाटील फुंकणार विधानसभेची ‘तुतारी’; लोकसभेने समीकरण बदलले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 05:56 PM2024-07-01T17:56:15+5:302024-07-01T17:56:50+5:30

रोहित पाटलांच्या विरोधात मैदानात कोण?

Tasgaon Rohit Patil will contest from Kavthe Mahankal assembly constituency | Sangli Politics: रोहित पाटील फुंकणार विधानसभेची ‘तुतारी’; लोकसभेने समीकरण बदलले

Sangli Politics: रोहित पाटील फुंकणार विधानसभेची ‘तुतारी’; लोकसभेने समीकरण बदलले

दत्ता पाटील

तासगाव : लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या उलथापालथीमुळे तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील समीकरणेदेखील बदलली आहेत. याच पार्श्वभूमीवर वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पाटील यांनी विधानसभेची तुतारी फुंकण्याची तयारी केली आहे. कार्यकर्त्यांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

‘खासदार आमचाच आणि आमदारपण आमचाच’ अशा राजकीय पटाची मांडणी केलेल्या तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील राजकारण लोकसभा निवडणुकीत ढवळून निघाले. तडजोडीच्या राजकारणाचा पट मोडीत निघाला आणि नव्या पटाची मांडणी झाली.

भाजपचे तत्कालीन खासदार संजय पाटील यांचा पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आत्मविश्वास वाढल्याचे चित्र आहे. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातच संजय पाटील पिछाडीवर राहिल्यामुळे आमदार गटाचा विधानसभेचा मार्ग सुकर झाल्याचा दावा शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

राष्ट्रवादीचे (शरद पवार गटाचे) युवा नेते रोहित पाटील येणारी विधानसभा निवडणूक लढवणार हे स्पष्ट आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून रोहित पाटील यांनी मतदारसंघात साखर पेरणी केली आहे. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे आणि माजी खासदार संजय पाटील यांच्यातील राजकीय संघर्षामुळे विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातील समीकरण बदलणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत खासदार विशाल पाटील यांना मिळालेल्या मताधिक्यामुळे आमदार गटाने विधानसभेसाठी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. रोहित पाटील यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या निमित्ताने रोहित पाटील विधानसभेची ''तुतारी'' फुंकणार आहेत.

रोहित पाटलांच्या विरोधात मैदानात कोण?

महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रोहित पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र, विरोधी महायुतीकडून विधानसभेला निवडणुकीच्या रिंगणात कोण असणार हे अद्याप निश्चित नाही. भाजपचे प्रभाकर पाटील यांचे नाव चर्चेत असले तरी माजी खासदार संजय पाटील रिंगणात उतरणार का? याची उत्सुकता आहे. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांचे पुत्र राजवर्धन घोरपडे यांच्याही भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Tasgaon Rohit Patil will contest from Kavthe Mahankal assembly constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.