तासगाव अर्बन बँकेस सव्वापाच कोटींचा नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:28 AM2021-04-07T04:28:46+5:302021-04-07T04:28:46+5:30
फाेटाे : ०६ कुमार शेटे तासगाव : तासगाव अर्बन बँकेने २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये ५ कोटी २० लाख रुपये ...
फाेटाे : ०६ कुमार शेटे
तासगाव : तासगाव अर्बन बँकेने २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये ५ कोटी २० लाख रुपये ढोबळ नफा मिळविला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या ठेवीमध्ये २४ कोटींची वाढ झाली असून मार्च २०२१ अखेरच्या ठेवी १८१.९७ कोटी आहेत. कर्जामध्ये २६.८० कोटींची वाढ होऊन मार्च २०२१ अखेरची कर्जे १२८.७४ कोटींवर गेली आहेत. ठेव वाढीचे प्रमाण १५.११ टक्के व कर्जवाढीचे प्रमाण हे २६.२९ टक्के असल्याचे बँकेचे अध्यक्ष महेश हिंगमिरे व उपाध्यक्ष कुमार शेटे यांनी सांगितले.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशामध्ये सर्वत्र लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे बँकिंग क्षेत्रावर मोठे संकट निर्माण झालेले होते. बंदमुळे वसुली पूर्णपणे ठप्प झाली. अशा परिस्थितीवर मात करत बँकेने प्रगती साधली आहे. मार्च २०२१ अखेर बँकेचे ढोबळ एनपीएचे प्रमाण २.०७ टक्के तर निव्वळ एनपीए प्रमाण शून्य टक्के आहे. बँकेच्या सर्व नऊही शाखा नफ्यामध्ये आहेत. सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक यांच्या मोलाच्या सहकार्याने संचालक मंडळाने पारदर्शक कारभार करून बँकेच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये ठेवी सुमारे २२५ कोटी व कर्जे सुमारे १६० कोटी करण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याचेही हिंगमिरे म्हणाले. बँकेच्या ग्राहकांना तत्काळ व चांगली सुविधा देण्यासाठी बँकेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला असून बँकेतर्फे ग्राहकांना जीवनज्योती विमा, प्रधानमंत्री सुरक्षा विमा, पॅनकार्ड काढण्याची सोय, आरटीजीएस/एनईएफटीची सोय अशा प्रकारच्या विविध सुविधा पुरविण्यात येत असून बँक ग्राहकांसाठी आयएसपीएस, भारत बिल पेमेंट तसेच एटीएम व मोबाइल बँकिंगची सुविधाही लवकरच सुरू करणार आहे.
या वेळी संचालक सदाशिव शेटे, अरुण पाटील, विनय शेटे, अनिल कुत्ते, उदय वाटकर, धोंडीराम सावंत, रामशेत शेटे, उदय डफळापूरकर, अमित शिंत्रे, सविता पैलवान, आशा माळी तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. लाड उपस्थित होते.