तासगावचा ‘बाहुबली’ ठरणार झेडपीच्या पटावर

By admin | Published: November 5, 2015 10:59 PM2015-11-05T22:59:29+5:302015-11-05T23:59:32+5:30

वर्चस्वासाठी संघर्ष : भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक संस्थांमध्ये व्यूहरचना

Tasgaon's 'Bahubali' will be on ZP's path | तासगावचा ‘बाहुबली’ ठरणार झेडपीच्या पटावर

तासगावचा ‘बाहुबली’ ठरणार झेडपीच्या पटावर

Next

दत्ता पाटील-तासगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीला संमिश्र यश मिळाले. निवडणूक निकालानंतरही वर्चस्ववादाचा मुद्दा तालुक्यात धुमसत आहेच. यश मिळाले तरी, त्याचे निर्भेळ श्रेय दोन्ही नेत्यांना घेता आले नाही. वर्चस्वासाठी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची वाट पाहावी लागणार आहेच. तोपर्यंत तालुक्यातील राजकीय संघर्ष कायम राहणार असून, त्यासाठीच्या व्यूहरचनेची या निवडणुकीतच चर्चा होताना दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्याचे बाहुबली कोण? याचे उत्तर झेडपीच्या आखाड्यात मिळणार आहे.
तासगाव तालुक्याच्या ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. राष्ट्रवादीच्या काही ग्रामपंचायती कमी झाल्या, तरी संख्यात्मकदृष्ट्या वर्चस्व कायम राहिले. भाजपच्या किंबहुना खासदार संजयकाका पाटील गटाच्या ग्रामपंचायतींची संख्या वाढली. यापूर्वी असलेले आबा गटाचे एकहाती वर्चस्वाचे चित्र बदलण्यात खासदार पाटील यांना यश मिळाले. त्यातूनच भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांत वर्चस्वाचा श्रेयवाद सुरू झाला. निकालानंतर दोन दिवस उलटले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तालुक्यात ‘वर्चस्व आमच्याच गटाचे‘ असा दावा केला जात आहे. कार्यकर्त्यांत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी होत आहेत. निवडणुका झाल्यानंतरही कोणत्याच नेत्याला विजयाचा आस्वाद घेता आला नाही, हे उघड सत्य नेत्यांच्याच भूमिकेतून दिसून येत आहे.
तालुक्यावर वर्चस्व ठरेल, असा ग्रामपंचायतींचा एकहाती निकाल लागला नाही. त्यामुळे दीड वर्षानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यावर कोणाचे वर्चस्व, हे दाखवून देण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून यंत्रणा कार्यान्वित केली आहे. यापूर्वीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सलग दोन निवडणुका आबा आणि काका गटाने एकत्रित लढवल्या होत्या.
दीड वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकांत मात्र तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादी आमने-सामने असणार आहे. आबांच्या पश्चात बदललेली समीकरणे आणि आमदार, खासदारांचा श्रेयवाद, यामुळेच या निवडणुकांत अधिक रंगत असणार आहे. तालुक्यातील वर्चस्व सिध्द करून दाखविण्यासाठी या निवडणुका दोन्ही नेत्यांना महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. त्याचीच रंगीत तालीम ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून झाली आहे. तालुक्यातील सहा महत्त्वपूर्ण जिल्हा परिषद गटातील गावांपैकी यावेळी मांजर्डे, सावळज, विसापूर आणि येळावी याठिकाणच्या निवडणुका झाल्या. विसापूर माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पाटील यांनी फारकत घेतल्यानंतरही या ठिकाणी राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राहिले. मांजर्डेचा गड कायम राखण्यात यश मिळाले. मात्र येळावीचा बालेकिल्ला सुफडासाफ झाला, तर आबांचे होमग्राऊंड असलेल्या सावळजमध्ये राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांशी हातमिळवणी करुन भाजपने ग्रामपंचायतीच्या सत्तेत शिरकाव केला. आता तालुक्यात बाहुबली कोण? हे दाखवून देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आखाड्यासाठीची तालीम आतापासूनच घुमणार, हे निश्चित.

मागील निवडणूक : जागा वाटपाचा फॉर्म्युला
तालुक्यावर माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे वर्चस्व जास्त असल्यामुळे दोन्ही नेत्यांच्या जागा वाटपात आबा गटाकडेच बहुतांश जागा होत्या. सहापैकी चार जिल्हा परिषदेच्या आणि आठ पंचायत समितीच्या जागा आबा गटाकडे, तर दोन जिल्हा परिषद आणि चार पंचायत समितीच्या जागा काका गटाकडे, असा फॉर्म्युला ठरला होता. मात्र मणेराजुरी जिल्हा परिषद गटात आबा गटाच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केल्यामुळे या ठिकाणी जिल्हा परिषदेसह दोन पंचायत समितीच्या जागा काका गटाला गमवाव्या लागल्या होत्या.

स्थानिक स्वराज्य संस्थांवर एक नजर
माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) गटाचे जिल्हा परिषदेचे पाच, तर दहा पंचायत समिती सदस्य आहेत
खासदार संजयकाका पाटील गटाचा समर्थक एक सदस्य आहे. पंचायत समितीचे दोन सदस्य आहेत.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.


वर्चस्वाचा श्रेयवाद
भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांत वर्चस्वाचा श्रेयवाद सुरू झाला. निकालानंतर दोन दिवस उलटले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तालुक्यात ‘वर्चस्व आमच्याच गटाचे‘ असा दावा केला जात आहे. कार्यकर्त्यांत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी होत आहेत.

Web Title: Tasgaon's 'Bahubali' will be on ZP's path

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.