तासगावच्या सहकार अधिकाऱ्यास लाच घेताना अटक
By admin | Published: January 20, 2015 12:21 AM2015-01-20T00:21:17+5:302015-01-20T00:21:34+5:30
या कारवाईची चाहूल लागल्याने वाघमारेचा सहायक सहकार अधिकारी सर्जेराव चव्हाण (रा. शिरगाव, ता. तासगाव) याने पलायन केले. मात्र लाच मागितल्याप्रकरणी त्याच्याविरुद्धही तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल
सांगली/तासगाव : सावकारी परवाना देण्यासाठी २८ हजारांची लाच घेणाऱ्या तासगाव येथील सहायक निबंधक संस्था कार्यालयातील सहकार अधिकाऱ्यास रंगेहात पकडण्यात आले. विजय वसंत वाघमारे (वय ४०, रा. केंगार गल्ली, हरिपूर रस्ता, सांगली) असे त्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज, सोमवारी दुपारी सव्वादोनला ही कारवाई केली. या कारवाईची चाहूल
लागल्याने वाघमारेचा सहायक सहकार अधिकारी सर्जेराव चव्हाण (रा. शिरगाव, ता. तासगाव) याने पलायन केले. मात्र लाच मागितल्याप्रकरणी त्याच्याविरुद्धही तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तासगाव तालुक्यातील आहेत. त्यांना सावकारी व्यवसाय करायचा होता. यासाठी परवाना घेण्यासाठी ते तासगावच्या सहायक निबंधक संस्था कार्यालयात गेले होते. त्यांनी वाघमारे याची भेट घेतली असता, परवाना देण्यासाठी वाघमारेने ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. यावेळी त्याच्या शेजारी त्याचा सहायक चव्हाण बसला होता. या दोघांनीही ‘लाचेची रक्कम दिल्याशिवाय परवाना देणार नाही’, असे सांगितले. यामुळे तक्रारदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती.
या विभागाने तक्रारीची चौकशी केली व तक्रारदारास त्यांनी पुन्हा या दोन्ही अधिकाऱ्यांकडे पाठविले. लाचेची रक्कम जास्त होत असून, ती कमी करण्यासाठी तक्रारदाराने विनंती केली. त्यावेळी दोघांनीही, दोन हजार रुपये कमी करुन २८ हजार रुपये देण्यास सांगितले. लाचेची रक्कम आज, सोमवारी देतो, असे तक्रारदाराने सांगितले. तत्पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या कार्यालयात सापळा लावला होता. वाघमारेला दुपारी सव्वादोनला २८ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यावेळी चव्हाण तेथे नव्हता. यामुळे तो सापडला नाही. मात्र प्रत्यक्षात तक्रारदाराकडे लाच मागताना त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. चव्हाणला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्याचा शोध सुरू असल्याचे पोलीस उपअधीक्षक प्रदीप आफळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)