तासगाव तालुक्यात अवैध धंदे जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2016 10:33 PM2016-04-27T22:33:27+5:302016-04-28T00:14:50+5:30

यंत्रणेचे दुर्लक्ष : दारू, गुटख्याची खुलेआम विक्री; कठोर कारवाईची गरज

Taskaga taluka illegal business | तासगाव तालुक्यात अवैध धंदे जोमात

तासगाव तालुक्यात अवैध धंदे जोमात

Next

तासगाव : तासगाव तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून अवैध धंद्यांना उधाण आल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरासह गावागावात खुलेआम दारू, गुटख्याची विक्री होत आहे. तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर असणाऱ्या ढाब्यांतूनही बेकायदेशीरपणे दारूची विक्री होत आहे. मात्र पोलिसांसह सर्वच प्रशासकीय यंत्रणेचे सोयीस्कर दुर्लक्ष झाले असून, दिवसेंदिवस अवैध धंदे फोफावत असल्याचे दिसून येत आहे.तासगाव तालुक्यात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्रिपदाच्या काळात अवैध धंद्यांना लगाम बसला होता. त्यामुळे तालुक्यात अपवादानेच बेकायदा धंदे सुरू असल्याचे दिसून येत होते. मात्र वर्षभरापासून तालुक्यात पुन्हा एकदा बेकायदा धंदेवाल्यांनी तोंड वर काढले आहे. तासगाव शहरासह तालुकाभरात बेकायदा धंदे दिवसेंदिवस जोमाने सुरु असल्याचे चित्र आहे. तासगाव शहरातील काही टपऱ्यांवर खुलेआमपणे दारूची विक्री होत आहे. शहराबरोबरच विटा रस्ता, सांगली रस्ता, भिवघाट रस्त्यासह इतर ठिकाणी असलेल्या ढाब्यांवरदेखील खुलेआमपणे बेकायदा दारूची विक्री होत आहे. काही गावात बेकायदा दारूविक्रेत्यांनीही तासगाव शहरात चांगलेच बस्तान बसवल्याचेही चित्र आहे. बेकायदा दारू विक्रीबरोबरच तालुक्यात गुटखा, पेट्रोलचीही बेकायदेशीरपणे विक्री होत आहे. अनेक गावांत काही पानटपऱ्या,दुकानांतून पेट्रोल, गुटख्याची खुलेआमपणे विक्री केली जात आहे. बेकायदेशीरपणे होणाऱ्या दारू, पेट्रोल आणि गुटख्याच्या विक्रीचे दरही बेकायदेशीर आहेत.
दीडपट ते दुप्पट दराने याची खुलेआमपणे विक्री होत आहे. तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर बेकायदेशीर धंदे खुलेआमपणे सुरु असताना कारवाई झाल्याचे चित्र कोठेचे दिसून येत नाही. संबंधित गावची जबाबदारी असणाऱ्या बीट अंमलदारांना, बेकायदा धंद्यांची माहिती असूनदेखील सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. पोलिस विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याने तालुक्यातील अवैद्य धंद्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा धंदेवाल्यांवर कोणाचीच जरब नसल्याने चित्र आहे.
काही पोलिसांची चिरमिरीची वृत्तीच याला कारणीभूत असल्याची चर्चा असून, काही पोलिस कर्मचारी या अवैध विक्रेत्याकडून वरकमाईत गुंतलेले दिसतात. एखाद्या महिन्याला एखाद्याची तासगाव वारी चुकली, तर दुसऱ्या महिन्यात दोन हजार रुपये द्यावे लागत असल्याची चर्चा आहे. एकूणच या साऱ्या प्रकारामुळे शहरात अवैध व्यवसाय जोमात असल्याचे दिसत आहे. यामुळे गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. याला लगाम घातला जावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.


ढाब्यावर खाकी : तरीही विक्री
तालुक्यात बेकायदा दारू विक्री होणाऱ्या ढाब्यांवर दौऱ्याच्या निमित्ताने काही ‘खाकी’ वर्दीवाल्यांची वर्दळ असते. त्यावेळी या ठिकाणी खाण्या-पिण्याचा कार्यक्रमही रंगलेला असतो. अनेकदा त्यासाठी स्पॉन्सर असतो. किंंबहुना ढाबेवाल्यांकडूनच खूश केले जात असल्याचे चित्र दिसून येत असून, अशा वागणुकीची नागरिकांत खुलेआम चर्चा सुरु आहे.

महिन्याला हजार रुपये
गावा-गावात अनेक ठिकाणी बेकायदा दारु विक्री सुरु आहे. या ठिकाणांची आणि सर्वच बेकायदा अड्ड्यांची माहिती खाकीतील काही कारभाऱ्यांना आहे. अशाच एका खाकीवाल्याकडून प्रत्येक महिन्याला न चुकता दारु विक्रेत्यांकडून एक हजार रुपयांचा मलिदा बेकायदा घेतला जातो. पोलिस ठाण्याच्या आवारापासून लांब अंतरावर असे व्यवहार होत असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे अवैध धंद्यांना लगाम घालणार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Taskaga taluka illegal business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.