तस्लिमाच्या लग्नाला महापुरुषांच्या विचारांचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 11:37 PM2019-11-05T23:37:54+5:302019-11-05T23:41:13+5:30
पाहुण्यांना आहेर न आणण्याची विनंती केली होती. त्यांनाच वधू-वर पक्षाकडून पुस्तकरूपी आहेर देण्यात आला. रुढी-परंपरांच्या विरोधातील संघर्ष लग्नमंडपातही जाणवत होता. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा मंत्रही या विवाहसोहळ्याने जपला.
अविनाश कोळी ।
सांगली : लग्न म्हणजे दोन हृदयांच्या, दोन कुटुंबांच्या मीलनाचा क्षण... या आनंदाच्या क्षणांना रुढी-परंपरांचे बंधन बांधले गेले आहे. मात्र हेच धागे तोडत परिवर्तनवादी विचारांचा, महापुरुषांच्या विचारांचा जागर करीत या क्षणाला लोकप्रबोधनाचे माध्यम बनविण्याची नवी परंपरा एका मुस्लिम दाम्पत्याने सांगलीतून सुरू केली. लोकांकडून आहेर स्वीकारण्याऐवजी पाहुण्यांनाच पुस्तकरूपी आहेर देण्याचा पायंडाही या लग्नात पाडण्यात आला.
कडेगाव तालुक्यातील चिंचणी अंबक येथील हारुण मुल्ला यांनी ही मुहूर्तमेढ रोवली. परिवर्तनवादी चळवळीत काम करणाºया मुल्ला यांनी आचरणातून या चळवळीला बळ दिले. त्यांच्या मुलीचे म्हणजेच तस्लिमाचे लग्न शाहनवाज या तरुणाशी ठरल्यानंतर, त्यांनी या विवाहाला परिवर्तनवादी विचारांनी भारीत करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही कुटुंबांनी संमती दिली. शाहनवाज यांचे आई-वडीलही याच विचाराचे आहेत. चिंचणी-अंबकला ३ नोव्हेंबररोजी हा विवाहसोहळा पार पडला. स्वागताला कमान उभी करून, प्रत्येक फुटावर एका महापुरुषाची प्रतिमा आणि त्याखाली त्यांचे कार्य, विचार यांचा उल्लेख केला होता. उपस्थितांसाठी हे प्रेरणादायी ठरले.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, राजे उमाजीराव नाईक अशा महापुरुषांच्या सुमारे १५ फलकांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
पाहुण्यांना आहेर न आणण्याची विनंती केली होती. त्यांनाच वधू-वर पक्षाकडून पुस्तकरूपी आहेर देण्यात आला. रुढी-परंपरांच्या विरोधातील संघर्ष लग्नमंडपातही जाणवत होता. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा मंत्रही या विवाहसोहळ्याने जपला.
विश्वजित कदम भारावले
लग्नसोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. आ. विश्वजित कदम यांचा हा मतदारसंघ असल्याने त्यांनीही हजेरी लावली. त्यांचे स्वागतही पुष्पहार घालून न करता पुस्तके भेट देऊन करण्यात आले. फलकांची रचना, लग्नसोहळ्यातील विचारांचा थाट आणि पुस्तकरूपी भेटीतून मांडलेली प्रबोधनाची संकल्पना त्यांना भावली. त्यांनीही या सोहळ्याचे कौतुक केले.
- एक हजार पुस्तकांचे वाटप
पाहुणे मंडळींना जी पुस्तके भेट देण्यात आली, त्यामध्ये कॉ. गोविंद पानसरेंचे ‘शिवाजी कोण होता?’, महात्मा फुले यांची ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्यांचे आसूड’, नरेंद्र दाभोलकर यांचे ‘प्रश्न तुमचा, उत्तर आमचे’ अशा पुस्तकांचा समावेश होता. अशी एक हजार पुस्तके वाटण्यात आली.