पेठच्या दोघा व्यापाऱ्यांनी बुडविला ११ कोटींचा कर
By Admin | Published: April 28, 2017 12:47 AM2017-04-28T00:47:06+5:302017-04-28T00:47:06+5:30
पेठच्या दोघा व्यापाऱ्यांनी बुडविला ११ कोटींचा कर
इस्लामपूर : पेठ (ता. वाळवा) येथील दोन खाद्यतेल व्यापाऱ्यांनी खोटे दस्तऐवज सादर करून शासनाचा ११ कोटींचा विक्रीकर बुडविल्याचा प्रकार उघडकीस आला. विक्रीकर विभागाने गुरुवारी रात्री या दोघा व्यापाऱ्यांविरुध्द पोलिसांत फिर्याद दिली आहे. कर बुडवेगिरीच्या या प्रकरणाने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल झालेल्यात राष्ट्रवादीच्या एका महिला पदाधिकाऱ्याचा समावेश आहे.
सुनीता संतोष देशमाने व महेशकुमार गजानन जाधव (दोघे रा. पेठ, ता. वाळवा) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. यातील सुनीता देशमाने यांनी २०१२-१३ ते २०१४ -१५ या तीन आर्थिक वर्षात ७ कोटी ५० लाख ३२ हजार ७५५ रुपयांचा कर बुडविला, तर महेशकुमार जाधव याने २०१३-१४ आणि १४-१५ या दोन आर्थिक वर्षात ३ कोटी ४९ लाख ७३ हजार ४५१ रुपयांची कर चुकवेगिरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. कोल्हापूर विभागाचे सहायक विक्रीकर आयुक्त राजू अण्णासाहेब चौगुले (रा. कोल्हापूर) यानी दोघांविरुध्द पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनीता देशमाने यांची महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनी, तर जाधव यांची महेश व्हेज आॅईल्स् ही फर्म आहे. हे दोघे व्यापारी रिफार्इंड पाम या खाद्य तेलाची विक्री करतात. आॅक्टोबर २०१४ मध्ये तत्कालीन सहायक विक्रीकर आयुक्त सिध्दी संकपाळ यांनी दोन्ही फर्मना भेट देऊन वरील काळातील पामतेल विक्री व्यवहाराची माहिती घेतली होती. मुंबई कस्टम विभागाकडून मिळालेली माहिती व या व्यापाऱ्यांनी विक्रीकर विभागाला पॉँडेचरी राज्यात तेल विक्री केल्याची माहिती यामध्ये तफावत आढळली. मुंबई येथील जे. एन. पी. टी बंदरावरून कस्टम ड्युटी भरून खरेदी केलेल्या तेलाची पॉँडेचरी राज्यात विक्री केल्याचे त्यांनी भासविले होते. त्यांनी सादर केलेल्या दस्तऐवजाची शहानिशा केल्यावर या व्यापाऱ्यांनी शासनाचा कर बुडविल्याचे निष्पन्न झाल्यानंतर केंद्रीय विक्रीकर कायद्याअन्वये कर चुकवेगिरी, फसवणूक, खोटे दस्तऐवज तयार करणे अशा स्वरुपाचा गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक प्रताप मानकर व फौजदार राजगुरू अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)