घरपट्टीसह पाणीपट्टीच्या दंडात मिळणार करमाफी : हारूण शिकलगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 11:51 PM2017-09-08T23:51:42+5:302017-09-08T23:52:33+5:30
सांगली : महापालिकेच्या थकीत घरपट्टी व पाणीपट्टीच्या वसुलीसाठी नागरिकांना कर सवलत देण्याचा निर्णय सत्ताधारी गटाने घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या थकीत घरपट्टी व पाणीपट्टीच्या वसुलीसाठी नागरिकांना कर सवलत देण्याचा निर्णय सत्ताधारी गटाने घेतला आहे. घरपट्टीच्या दंडात ५० टक्के व पाणीपट्टीच्या दंडात ७५ टक्के माफी देण्यात येणार असल्याचे महापौर हारूण शिकलगार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. येत्या महासभेत हा विषय अजेंडा घेऊन एकमताने त्याला मंजुरी घेऊन त्याची तातडीने अंमलबजावणी सुरू केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
शिकलगार म्हणाले, सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरांतील घरपट्टीची चालू व थकीत रक्कम ७४ कोटीच्या घरात आहे, तर पाणीपट्टीची रक्कम २४ कोटी आहे. महापालिका क्षेत्रात १ लाख २५ हजार मालमत्ताधारक असून त्यांच्याकडे निम्मी म्हणजे ३५ कोटीची थकबाकी आहे. यात दंड व व्याजाचाही समावेश आहे. यापूर्वी घरपट्टीच्या दंडात २५ टक्के सवलत देण्यात आली होती. त्यात आता वाढ करून ही सवलत ५० टक्के करण्यात येणार आहे. त्यामुळे ६ कोटी २० लाख रुपयांची नागरिकांना माफी दिली जाईल.
पाणीपट्टीची थकबाकी गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून आहे. काही नळ कनेक्शन्स बंद असूनही दंड-व्याजावर व्याज अशा पद्धतीने हा आकडा फुगलेला आहे. त्यांच्या दंडात ७५ टक्के माफी देण्यात येणार आहे.महापालिकेच्या अंदाजपत्रकात घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी वर्षानुवर्षे जशीच्या तशी आहे. त्यामुळे थकबाकीचा आकडा फुगत चालला आहे. काही प्रकरणात तर नागरिकांना नाहक दंड व व्याजाची आकारणी झाली आहे. ही सर्व प्रकरणे निकालात काढण्यासाठी करमाफीचा प्रस्ताव आणला आहे. येत्या महासभेत हा विषय अजेंड्यावर घेऊन एकमताने त्याला मंजुरी घेऊ. त्यानंतर त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यासही प्रशासनाला विनंती करू, असेही शिकलगार म्हणाले.
महापालिकेचा करमाफीचा प्रस्ताव
घरपट्टी विभागाकडून यापूर्वी २५ टक्के करमाफी दिली जात होती. त्यातून सांगलीला १ कोटी ९३ लाख, मिरजेला ९४ लाख, तर कुपवाडला २७ लाख, अशी एकूण ३ कोटी १० लाखाची सवलत मिळत होती. आता ५० टक्के माफीत सांगलीला ३.८७ कोटी, मिरजेला १.८९ कोटी, तर कुपवाडला ४३ लाख, अशी एकूण ६ कोटी २० लाख रुपयांची सवलत मिळणार आहे. पाणीपट्टीत एक हजार ९९९ ग्राहक थकबाकीत आहेत. त्यांना ७५ टक्के सवलत दिल्यास दीड कोटी रुपयांचा फटका महापालिकेला बसेल.