पोलिसांवर हात उचलणाऱ्यांना धडा शिकवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:28 AM2021-05-20T04:28:40+5:302021-05-20T04:28:40+5:30
पोलिसांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठान युवा संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम यांच्याकडे करण्यात आली. ...
पोलिसांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठान युवा संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम यांच्याकडे करण्यात आली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील बदाम चौक व विश्रामबाग चौक येथे पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले. याप्रकरणी पोलीसप्रमुखांनी केलेली कारवाई योग्यच असून, असे धाडस पुन्हा कोणीही करू नये म्हणून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आली.
संघटनेचे संस्थापक नितीन चौगुले यांनी याप्रकरणी जिल्हा पोलीसप्रमुखांना निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की, जिल्हा पोलीसप्रमुख म्हणून आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून समाजकंटकांच्या विरोधात केलेली कठोर कारवाई समर्थनीय आहे. याबद्दल आम्ही पोलीसप्रमुखांचे अभिनंदन करीत आहोत. देशावर आलेल्या कोरोनासारख्या संकटाच्या विरोधात लढताना डॉक्टर व पोलीस अग्रभागी आहेत. डॉक्टर हे हॉस्पिटलमध्ये सेवा बजावीत आहेत. मात्र, पोलीसबांधव २४ तास रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावत आहेत.
अशावेळी देशातील प्रत्येक नागरिकाला पोलिसांबद्दल नितांत आदर व अभिमान आहेच; पण काही समाजकंटक लोक पोलिसांशी गैरवर्तणूक करून त्यांच्यावर हल्ले करीत आहेत. सांगलीमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. या समाजकंटकांना आळा घातला पाहिजे. आपणास शक्य तेवढी कठोर कारवाई या समाजकंटकांवर करावी. वेळ पडली तर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची फौज पोलिसांसोबत २४ तास उभी असेल. सांगलीत आलेल्या महापुराच्या कालावधितसुद्धा पोलीस, लष्करी जवान, एन.डी.आर.एफ. व नेव्ही यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून आम्ही काम केले आहे, तसेच कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा आम्ही चोवीस तास पोलीस बांधवांसोबत होतो.