शिक्षक बँकेने सरकारी रुग्णालय सुरू करावे
By admin | Published: April 14, 2017 11:30 PM2017-04-14T23:30:16+5:302017-04-14T23:30:16+5:30
सुभाष देशमुख : ‘सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका’ पुरस्कार प्रदान समारंभ
सांगली : प्राथमिक शिक्षक बँकेच्या कार्यक्षेत्र वाढीचा प्रश्न प्रलंबित आहे. हा प्रश्न मार्गी लावू, पण शिक्षक बँकेने गोरगरिबांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानावे सरकारी रुग्णालय सुरू करावे, अशी अपेक्षा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी सांगलीत व्यक्त केली. त्यावर शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर यांनीही, रुग्णालयाचा प्रस्ताव लवकरच पाठविण्याची ग्वाही दिली.
प्राथमिक शिक्षक बँकेच्यावतीने जिल्ह्यातील २३ शिक्षिकांना ‘सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका’ पुरस्काराने शुक्रवारी गौरविण्यात आले. या कार्यक्रमात मंत्री देशमुख बोलत होते. यावेळी आयएसओ मानांकन प्राप्त ३८ शाळा व ११० सेवानिवृत्त शिक्षक सभासदांचाही सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी शिक्षक समितीचे राज्यनेते विश्वनाथ मिरजकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शिवाजीराव नाईक, गोपीचंद पडळकर उपस्थित होते.
देशमुख म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाचे वर्ष गरीब कल्याण वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्यात शिक्षक बँकेनेही सहभाग नोंदवावा. बँकेचे सात हजार सभासद आहेत. या सभासदांनी एकत्रित येऊन गरिबांसाठी सरकारी रुग्णालय सुरू करावे. त्याचा लाभ गोरगरिबांसह शिक्षक सभासदांनाही होईल. या रुग्णालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे. देशमुख यांनी उपस्थित शिक्षकांना प्रश्न करीत, नियोजित रुग्णालयाला सहमतीही घेतली. शिक्षक बँकेने ३० एप्रिलपर्यंत रजिस्ट्रेशन करावे. या कामासाठी सर्व ते सहकार्य केले जाईल. तुम्ही सरकारी रुग्णालय सुरू करा, बँकेचे कार्यक्षेत्र मी वाढवून देतो, अशी ग्वाही दिली.
शिक्षकांकडून समाजाच्या खूप अपेक्षा आहेत. राष्ट्र उभारणीचे काम शिक्षकांकडून घडत असते. पण आजकाल प्राथमिक शिक्षणाची अवस्था पाहिल्यास, चिंतनाची आवश्यकता आहे. अन्यथा ही व्यवस्थाच ढासळेल. पालकांनी तुमच्या हाती विद्यार्थीरुपी दगड दिला आहे. त्याला घडविण्याचे काम शिक्षकांनी करावे, असे आवाहन केले.
यावेळी आमदार शिवाजीराव नाईक, विश्वनाथ मिरजकर यांचीही भाषणे झाली. बँकेचे अध्यक्ष सदाशिव पाटील यांनी स्वागत केले. कार्यक्रमास शेखर इनामदार, शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे, जिल्हा नेते किसन पाटील, किरण गायकवाड, जिल्हाध्यक्ष सयाजीराव पाटील, सरचिटणीस बाबासाहेब लाड, बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना खटावकर, संपतराव चव्हाण, शशिकांत भागवत, यु. टी. जाधव, अंजली कमाने, मंगल कनप, सुरेखा मिरजकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
चोर, भ्रष्टाचारी कुणी घडविले?
पंतप्रधान, राष्ट्रपती, शास्त्रज्ञ, इंजिनिअर, वकील, डॉक्टर या मंडळींना शिक्षकांनी घडविले, असे सांगत मंत्री देशमुख यांनी शिक्षकांच्या कामाचे कौतुक केले. पण त्याचसोबत चोर, भ्रष्टाचाऱ्यांना कुणी घडविले? असा सवालही त्यांनी उपस्थितांना केला. त्यावर उपस्थित शिक्षकांनी, आम्ही नाही घडविले, असे सांगितले. त्यामुळे सभागृहात हशा पिकला. चोर, भ्रष्टाचाऱ्यांची संख्या कमी असली तरी, ते राष्ट्राची वाट लावत आहेत, असा चिमटा देशमुख यांनी काढला.