बदलीसाठी सीईओंसमोर आकांडतांडव, सांगली जिल्हा परिषद इमारतीवरुन उडी टाकण्याची शिक्षिकेची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 03:00 PM2024-12-04T15:00:17+5:302024-12-04T15:00:42+5:30
पोलिसांत गुन्हा, शिक्षिका कवठेमहांकाळची
सांगली : कवठेमहांकाळमधील एका शिक्षिकेने चक्क जिल्हा परिषदेच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्येची धमकी दिली. त्याची गंभीर दखल घेत प्रशासनाने तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली. विश्रामबाग पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात हा गोंधळ झाला. त्यानंतर, रात्री उशिरा प्रशासनाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संबंधित शिक्षिका कवठेमहांकाळमध्ये सहकुटुंब राहण्यास आहे. जत तालुक्यातील एका शाळेत नियुक्त आहे. तिच्या वर्तनाविषयी पालकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. याची दखल घेत, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, पालकांच्या तक्रारीत तथ्य आढळले. त्यामुळे सुमारे दीड महिन्यांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी तिच्यावर निलंबनाची कारवाई केली. निलंबन काळात शिराळा तालुक्यात नियुक्ती दिली.
पण दूरच्या तालुक्यात नियुक्ती दिल्याने शिक्षिका संतापली. कवठेमहांकाळ तालुक्यातच बदलीची मागणी केली. त्यासाठी महिन्याभरापासून जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांकडे पिच्छा पुरविला. मात्र, कारवाईवर प्रशासन ठाम राहिले. त्यामुळे तिने सोमवारी रुद्रावतार धारण करीत मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या दालनात दंगा केला. ‘कवठेमहांकाळमध्ये बदली केली नाही, तर जिल्हा परिषदेच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या करू,’ असा इशारा दिला. धोडमिसे यांनी याची गंभीर दखल घेतली. तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली.
शिक्षिकेची बदली शिराळा तालुक्यात केली असली, तरी प्रशासकीयदृष्ट्या तशी कार्यवाही केली होती. तीन महिन्यांनी निलंबन मागे घेऊन पुन्हा पूर्ववत नियुक्ती दिली जाणार होती, पण शिक्षिकेने प्रशासनाच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करीत जिल्हा परिषदेत बेशिस्त वर्तन केले. - तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगली जिल्हा परिषद