शिक्षक बँकेने ५० हजारांवरील शेअर्स परत द्यावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:32 AM2021-09-07T04:32:15+5:302021-09-07T04:32:15+5:30
सांगली : प्राथमिक शिक्षक बँकेत सभासदांच्या शेअर्स रकमा दोन लाखांच्या पुढे आहेत. लाभांशापोटी त्यांना कमी फायदा होतो. त्यामुळे ५० ...
सांगली : प्राथमिक शिक्षक बँकेत सभासदांच्या शेअर्स रकमा दोन लाखांच्या पुढे आहेत. लाभांशापोटी त्यांना कमी फायदा होतो. त्यामुळे ५० हजारांवरील शेअर्स रकमा परत करण्याचा पोटनियम येत्या वार्षिक सभेत करावा, अशी मागणी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे यांनी सोमवारी केली.
शिंदे म्हणाले की, बँकेची कर्ज मर्यादा ही ३० ते ३५ लाखांपर्यंत आहे. शेअर्स रकमेपोटी ५ टक्के कपात होते. प्रत्येक सभासदांची शेअर्स रक्कम ही दोन लाखांच्या आसपास आहे. दरवर्षी दोन ते पाच टक्के लाभांश दिला जातो. हा लाभांश अत्यल्प असल्याने सभासदांचे नुकसान होते. त्यासाठी ५० हजारांवरील शेअर्स रकमा परत कराव्यात. बँकेकडून मृतसंजीवनी योजनेत कर्जदार व बिगर कर्जदारांच्या पगारातून सरसकट शंभर रुपये वसूल केले जातात. पण सभासदाचा मृत्यू झाल्यानंतर मदत देताना मात्र दुजाभाव होतो. त्यासाठी मृत सभासदांच्या कुटुंबीयांना समान न्याय द्यावा. सर्वसाधारण सभेत बँकेच्या स्थावर मालमत्तेचा विषय हा कोणाच्या भल्यासाठी घातला आहे असा सवाल त्यांनी केला.
वार्षिक सभेत सत्ताधाऱ्यांचा कारभार सभासद उघडा पाडतील, म्हणून ऑनलाईन सभा घेतली आहे. पारदर्शी कारभार असेल तर सत्ताधाऱ्यांनी सभासदांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे द्यावीत, असे आवाहनही दिले. यावेळी सरचिटणीस अविनाश गुरव, पार्लमेंटरी बोर्डाचे अध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी, अरुण पाटील, हंबीरराव पवार, तानाजी खोत, महादेव हेगडे, श्यामगोंडा पाटील, बाजीराव पाटील, शोभा पाटील, दगडू येवले, फत्तेसिंग पाटील, राजकुमार पाटील, शशिकांत माणगावे उपस्थित होते.