शिक्षकांमध्ये बापाचा धाक आणि आईची हाक हवी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2016 12:49 AM2016-06-26T00:49:16+5:302016-06-26T00:49:16+5:30
इंद्रजित देशमुख : जिल्ह्यातील गुरुजनांना दिला संस्काराचा मूलमंत्र
सांगली : संस्कारक्षम विद्यार्थी घडवायचा असेल, तर सर्वप्रथम शिक्षकांमध्ये ते गुण असणे आवश्यक आहे. आपल्या विद्यार्थ्यांवर अफाट प्रेम करताना, शिक्षकाच्या एका डोळ्यात प्रेम असायला हवे, तर एका डोळ्यात मुलांच्या चिंतेने वेदना असायला हव्यात. विद्यार्थ्यांच्या यशासाठी धडपडणाराच खरा शिक्षक असून, शिक्षकांमध्ये बापाचा धाक आणि आईची हाक असायला हवी, असे भावनिक आवाहन ज्येष्ठ विचारवंत आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी शनिवारी केले.
‘लोकमत’च्यावतीने आयोजित जिल्ह्यातील दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळविणाऱ्या शाळांच्या गौरव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. देशमुख म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सुगंध आणि जगण्यामध्ये क्षमता निर्माण करण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. विद्यार्थी जेथे चुकतो, तेथे त्याला समजावणे आणि बरोबर असेल तर त्याला आधार देण्याचे काम आई-वडिलांइतकेच आत्मियतेने केवळ शिक्षकच करू शकतो. सध्या समाजात वाढत असलेला भ्रष्टाचार आणि स्वैराचारावर नियंत्रण आणण्यासाठी व संस्कारक्षम पिढीचा आग्रह कायम राखण्यासाठी शिक्षकांनी नावीन्याचा ध्यास घ्यावा.
ते म्हणाले की, जिथे शाळा सुटल्यानंतरही मुलांची पावले घुटमळतात आणि सकाळी आपसुकपणे शाळेकडे वळतात, तीच शाळा खऱ्याअर्थाने आदर्श शाळा असते. त्यामुुळे शिक्षकांना बाहेरचा त्रास कितीही असला तरी, वर्गातील त्यांचा प्रवेश आनंददायी असायला हवा. शिक्षकांमध्ये असणारी ऊर्जा आणि शिकविण्यातील जिवंतपणाच विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरतो. (प्रतिनिधी)
तीन वर्गात विभागलेला समाजच खरे आव्हान
एखाद्या गोष्टीवर कार्य केल्यानंतरच संस्कार निर्माण होत असतात. ज्याप्रमाणे पावसाचा एक थेंब शिंपल्यात पडला, तर त्याचा मोती होतो. तसेच तोच थेंब नागाच्या तोंडात पडला, तर त्याचे विष होते. अगदी त्याचप्रमाणे सध्या विभागलेला समाज हाच शिक्षकांसमोर पिढी घडविण्यासाठीचे आव्हान आहे. ‘आहे रे’, ‘नाही रे’, ‘खूपच आहे रे’ या समाजात असलेल्या तीन वर्गांना एकरूप करीत संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याचे आव्हान शिक्षकांसमोर असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.