शिक्षकांकडून २ फेब्रुवारीची डेडलाईन
By admin | Published: January 13, 2015 11:41 PM2015-01-13T23:41:44+5:302015-01-14T00:29:52+5:30
बेमुदत शाळा बंदचा इशारा : विविध मागण्यांसाठी सांगलीत मोर्चा, निदर्शने
सांगली : शिक्षक भरतीवरील बंदी उठवण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी आज (मंगळवार) महाराष्ट्र राज्य शिक्षण क्षेत्र संघटना समन्वय समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर, २ फेब्रुवारीपासून माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष विजय गायकवाड, सचिव जयसिंग पाटील यांनी केले.
आंदोलनामध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षण संस्थाचालक आदी सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर त्याचे रूपांतर सभेत झाले. यावेळी विजय गायकवाड म्हणाले की, शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत शासन दुर्लक्ष करीत आहे. शिक्षक भरती करावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, आदी मागण्यांसाठी १९९८ पासून शिक्षकांचा लढा सुरू आहे. आता याकडे दुर्लक्ष झाल्यास २ फेब्रुवारीपासून बेमुदत शाळा बंद ठेवून आंदोलन करण्यात येईल. शासनाने तशी वेळ येऊ देऊ नये.
जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत. शिक्षक भरतीवरील बंदी उठवा, शिक्षकेतर सेवकांची संख्या कमी करणारा नवीन आकृतीबंद रद्द करण्यात यावा, तुकड्यांची संख्या कमी करण्याचा आदेश मागे घेण्यात यावा, शाळांचे थकित वेतनेतर अनुदान एकरकमी देण्यात यावे, विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावे, शिक्षण विभागाचे महसूल विभागात विलिनीकरण थांबवण्यात यावे, विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यात यावा, टीईटी योजना रद्द करण्यात यावी.
मोर्चाची सुरुवात येथील पुष्पराज चौकातून करण्यात आली. मोर्चा राममंदिर, काँग्रेस भवन, स्टेशन चौक, राजवाडा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. याठिकाणी मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. आंदोलनामध्ये माजी आमदार शरद पाटील व भगवानराव साळुंखे, सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन खाडिलकर, संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष एस. एस. पाटील, सचिव एस. के. पाटील, प्रभाकर खाडिलकर, रावसाहेब पाटील, संजय धामणगावकर, रघुनाथ सातपुते, अर्जुन सावंत, बाबूराव साळुंखे आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
तर दहावी, बारावी परीक्षेवर बहिष्कार
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर, आगामी दहावी, बारावीच्या परीक्षेवर संपूर्ण राज्यात बहिष्कार घालण्यात येईल, असा इशारा विजय गायकवाड यांनी दिला. आजच्या आंदोलनात रयत शिक्षण संस्था वगळता सर्व शिक्षण संस्था सहभागी झाल्याने सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा बंद होत्या.